औरंगाबाद | महापालिका निवडणुकांच्या तोंडावर दिलेले मेट्रोचे (Aurangabad Metro) आश्वासन केवळ हवेत विरणाऱ्या गप्पा ठरू नयेत, याची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे चित्र सध्या दिसतेय. शहरातील मेट्रो रेल्वे सुरु करण्यासाठी डीपीआर (DPR) तयार करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. सध्या वाळूज ते शेंद्रा MIDC आणि रेल्वे स्टेशन ते हर्सूलमार्गे सिडको चौक हे मार्ग समोर ठेवून प्राथमिक सर्वेक्षण (Basic Survey) सुरु आहे. पुढील महिनाभरात मेट्रोच्या मार्गावर शिक्कामोर्तब होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे-मुंबईच्या धर्तीवर औरंगाबादमध्येही लवकरच मेट्रो रेल्वे सुरु करु, असे आश्वासन देण्यात आले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भागवत कराड यांनी पुढाकार घेत स्मार्ट सिटी आणि महामेट्रो यांची संयुक्त बैठकही घेतली होती. त्यात डीपीआर तयार करण्याचे काम महामेट्रोला देण्यात आले. स्मार्ट सिटीने सूचना केल्यानंतर महामेट्रोने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
औरंगाबादच्या नागरिकांना प्रवासासाठी मेट्रोचा कोणता मार्ग अधिक व्यवहार्य ठरतोय, हे तपासण्यासाठी चौका-चौकात ट्रॅफिकचे मोजमाप केले जात आहे. लोकांशी संवाद साधून तुम्ही कोणत्या वाहनाचा वापर करता, कोणता रुट अधिक वापरता, मेट्रोने प्रवास करणे तुम्हाला आवडेल का आदी प्रश्न विचारण्यात येत आहेत. यासोबतच स्मार्ट सिटी बसचे मार्ग कोणते, आरीटओकडे दरवर्ष किती नवीन खासगी वाहनांची नोंद होते आदी माहितीदेखील संकलित केली जात आहे.
मेट्रो रेल्वेचे तीन प्रकार असतात. हेवी मेट्रो, लाईट मेट्रो आणि मेट्रो नियो. यापैकी औरंगाबाद शहरात कोणती मेट्रो चालणे व्यवहार्य ठरेल, याचाही अभ्यास सदर सर्वेक्षणात केला जाणार आहे. नागरिकांच्या गरजा आणि भौगोलिक स्थिती लक्षात घेता यापैकी एक प्रकार निशअचित करून त्याचाच डीपीआर तयार केला जाईल. साधारण 25 किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरु करायची झाल्यास तिचा खर्च हा सुमारे सहा हजार कोटी रुपये एवढा असू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मेट्रोसाठीचे प्राथमिक सर्वेक्षण महिनाभरात पूर्ण होईल. त्यानंतर महापालिका, स्मार्ट सिटी, सिडको आदी स्टेक होल्डरची बैठक होऊन त्या मार्गावर शिक्कामोर्तब होईल. पुढील महियात संबंधित मार्गावर माती परीक्षण केले जाईल. प्रत्येक अर्धा किंवा एक किमीवर थोडे खोदकाम करुन मातीचे नमूने संकलित केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर बातम्या-