औरंगाबादः देवगिरी महानंद या नावाने औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे दूध (Deogiri Mahanand) मराठवाड्यातील बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक होत आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फार कमी दिसतेय. येत्या 20 डिसेंबर रोजी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान घेतले जाईल.
जिल्ह्यातील दूध उत्पाक संघाचे विद्यमान अध्यक्ष भाजप नेते हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलकडे आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक पातळीवर सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न हरिभाऊ बागडे यांचा आहे, मात्र त्यात त्यांना कितपत यश येतंय, हे सांगता येत नाही. राज्यातल्या महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पॅटर्न आहे. तोच पॅटर्न इथे राबवण्याचा विचार असल्यास विद्यमान संचालक मंडळाबद्दलच्या विरोधातील मतांचा लाभ महाविकास आघाडीला मिळवता येऊ शकतो.
महाविकास आघाडी सरकार भाजपविरुद्ध उमेदवार देऊ शकते. तसेच अनेक संचालक अनेक वर्षांपासून संघात आहेत. आता नव्यांना संधी दिली पाहिजे, अशी भूमिकादेखील घेतली जाऊ शकते. त्यानंतर भाजप नेते हरिभाऊ बागडे यांची काय भूमिका असेल, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, 20 डिसेंबर रोजी जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच राजकीय हालचालींना आणखी वेग येईल.
इतर बातम्या-