औरंगाबादः आज हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान चालीसाचे सामुहिक वाचन करण्यात आले. शहरातील औरंगपुऱ्यातील दक्षिण मुखी हनुमान मंदिराजवळ मनसेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या मंदिराजवळ मनेसेचे अनेक कार्यकर्ते सकाळीच जमले होते. त्यानंतर हनुमान मंदिरासमोर सर्वांनी बसून हनुमान चालीसाचे पठण केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीनिमित्त भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आवाहन केले होते. त्याचे पालन करत औरंगाबाद मनसेच्या वतीने दक्षिण मुखी मरोती मंदिरासमोर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आज मनसेच्या वतीने हनुमान चालिसाच्या सामुहिक वाचनाचा कार्यक्रम ठेवण्यात आल्यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सामजिक शांतता भंग करू नये, अशी नोटीस पाठवली होती. त्यावर मनसे जिल्हाध्यक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. कायदा हा सर्वांसाठी समान आहे आणि हनुमान जयंतीला आम्ही हनुमान चालिसाचे सामुहिक पठण करत आहोत, तर हे नोटिसा काय पाठवतात, याचं मला आश्चर्य वाटतंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या भगव्या वादळाची ही सुरुवात आहे, असं वक्तव्य मनसेचे जिल्हाध्यक्ष समित खांबेकर यांनी दिली. यानंतर प्रत्येक वॉर्डात फिरून हनुमान चालीसाच्या पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार असल्याचं सुमित खांबेकर यांनी सांगितलं.