छत्रपती संभाजनीगर | औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यास राज्य तसेच केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरही नामांतर विरोधी संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. तसेच संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ शहरातील नागरिकांनी दाखल केलेल्या हरकती आणि आक्षेपांमधूनही काहीसं वेगळं चित्र निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ हजारो नागरिकांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी मोहीमा सुरु आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील यात पुढाकार घेतला आहे.16 मार्च रोजी मनसेच्या संभाजीनगर शाखेच्या वतीने शहरातून महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय. मनसेने या रॅलीला स्वप्नपूर्ती रॅली असे नाव दिले आहे. या रॅलीसाठी पोलिसांनी परवानगी मिळाली नाही तरीही हा भव्य मोर्चा शहरातून निघणारच, असा निर्धार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केलाय.
या रॅलीमागील नेमका उद्देश मनसेने स्पष्ट केलाय. केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले आहे,या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. परंतु या आनंदामध्ये काही लोक विरजण कालवण्याचे काम करीत आहेत. त्यांनी कुठलेही कारण नसतांना छत्रपती संभाजीनगर नावास विरोध केला आहे. ज्या प्रमाणे विरोध होईल त्याच प्रमाणे उत्तर देण्यात येईल असा इशारा मनसेने दिला होता.त्यामुळे नामांतराच्या विरोधाला जशास तसे उत्तर देण्यात येणार आहे, अशी भूमिका मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी मांडली.
अनेक दशकापासून चे स्वप्न छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांचे पूर्ण झाले असून त्या सर्व लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने “स्वप्नपूर्ती रॅली ” आयोजित केली आहे. आजपासूनच मनसेच्या वतीने शहरातील नागरिकांकडून संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ पत्रके भरून घेतली जात आहेत. अशी लाखो पत्रकं जमा करण्यात येणार असल्याचं छत्रपती संभाजीनगर मधील लाखो लोकांनी आपली समर्थन पत्रे त्वरित जमा करावीत असे आवाहन मनसे तर्फे करण्यात आले आहे.
दिनांक 16 मार्च 2023 गुरुवार रोजी सकाळी 11:30 वाजता समर्थन रॅली ची सुरवात संस्थान गणपती येथून होणार असून हजारो पत्रके आणि समर्थन पत्र मनसे तर्फे विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहेत. याकरिता आज मनसेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस पक्षाचे नेते दिलीप बापू धोत्रे,सरचिटणीस संतोष नागरगोजे,अशोक तावरे, सतनामसिंग गुलाटी,जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर,दिलीप बनकर पाटील,वैभव मिटकर,बीपिन नाईक,गजन गौडा पाटील,अनिकेत निल्ल्लावार,प्रशांत जोशी,संकेत शेटे,नागेश तूसे,अशोक पवार,राहुल पाटील,विक्रम सिंग परदेसी,मनीष जोगदंड आदी पदाधिकारी उपस्थित होते.