Aurangabad | ‘शहरातल्या नशेखोरांना पोलीसांचंच अभय; कारवाईसाठी विशेष पथक नेमा’ , खा. इम्तियाज जलील यांची मागणी

| Updated on: May 15, 2022 | 6:00 AM

नशेच्या गोळ्यांमुळे अनेक जणांचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झालेले असून अनेकांनी आपले प्राण गमावल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Aurangabad | शहरातल्या नशेखोरांना पोलीसांचंच अभय; कारवाईसाठी विशेष पथक नेमा , खा. इम्तियाज जलील यांची मागणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः शहरातील वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी व अल्पवयीन मुले व तरुणांचे जीवन उध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी नसेच्या गोळ्या विक्री, खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केली आहे. अशा लोकांना पोलीस कर्मचारीच (police) अभय देत असल्याचा आरोप त्यांनी केला असून पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणीही त्यांनी केली आहे. खा. जलील यांनी यासंदर्भातील पत्र पोलीस आयुक्तांना पाठवले आहे. गेल्या काही दिवसात औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारीच्या अनेक घटना घडल्या असून यामागे वाढलेली नशेखोरी हे कारण असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी ही मागणी केली आहे.

‘नशेखोरीमुळे गुन्हेगारीचा आलेखही तेजीत’

औरंगाबाद शहरातील अनेक अल्पवयीन मुले व तरुणाई नशेच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसापासून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून किरकोळ कारणावरून हत्याही झालेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसापासून शहरात वाढलेली गुंडगिरी आणि गुन्हेविषयक घटनांमागे नशेखोरांचे प्रमाण जास्त असल्याचे अनेक वेळा सिद्ध झालेले आहेत. नशेखोरी मुळे शहराचा गुन्हेगारीचा आलेख तेजीत वाढत असून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी आधी नशेबाजांवर लगाम घालणे अत्यावश्यक झालेले आहे, असे वक्तव्य खा. जलील यांनी पत्रातून केले आहे.

हे सुद्धा वाचा

‘छुप्या मार्गाने नशेच्या गोळ्या’

शहरातील अनेक भागात छुप्या मार्गाने काही टोळ्या आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीविना गल्लीबोळातील अनेक औषध विक्रेत्याकडून बटण, ऑरेंज आणि किटकॅट च्या नावाखाली झोपेच्या गोळ्याचा डोस देण्याचे उद्योग सर्रासपणे सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. नशेच्या गोळ्यांमुळे अनेक जणांचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झालेले असून अनेकांनी आपले प्राण गमावल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमूद केले.

पोलीस कर्मचाऱ्यांचं अभय?

खासदार इम्तियाज जलील यांनी नशेखोरी वाढण्यासाठी पोलीसही जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पत्रात ते म्हणाले, ‘ शहरातील अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत नशेच्या गोळ्याच्या कारभार मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे सुरु आहे. संबंधित पोलीस स्टेशन मधील काही अधिकारी व कर्मचारी यांना त्याची संपूर्ण माहिती असून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही; ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. संबंधित पोलीस स्टेशनच्या अनेक अधिकारी व कर्मचारी यांचे नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या सोबत आर्थिक संबंध असल्याची चर्चा सुद्धा शहरात सुरु असल्याचे समजते. नशेखोरांवर, नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यावर पोलिसांची वचक नसल्याने आणि संबंधित पोलीस स्टेशन काहीही कारवाई करत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलीस विभागाची प्रतिमा मलीन होत असल्याचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता याना पत्राद्वारे कळविले.