औरंगाबाद: शहरात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांमध्ये नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, नव-नवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहन औरंगाबादचे मनपा (Aurangabad Municipal corporation)प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी केले. आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शहरातील उपक्रमांमध्ये हातभार लावतानाच नागरिकांनी निदान आपली गाडी व्यवस्थित पार्क केली तरी मोठे योगदान ठरेल, असा टोलाही मनपा प्रशासकांनी नागरिकांना लगावला. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र (Maulana Abul Kalam Azad Research center) येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. शहरातील विविध सेवा भावी संस्थेचे प्रतिनिधी, शाळा कॉलेजचे प्रतिनिधी, हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी, एनसीसी , एस आर पीएफचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत असताना लोकसहभाग महत्वाचा आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन यासाठी आपले योगदान दिले पाहिजे. एक नागरिक म्हणून आपण एक वर्षभर शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले पाहिजेत. आपल्या आपल्या अभिनव पद्धतीनेही हा अमृत महोत्सव साजरा करू शकतो. प्रकल्प राबविण्यास महानगरपालिका किंवा स्मार्ट सिटीची मदत लागत असेल तर यासाठी आम्ही सदैव तयार आहोत, असे आवाहन औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी केले. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित आझादी का अमृतमहोत्सवी वर्षाला सुरुवात झाली आहे. यात औरंगाबाद महानगर पालिका व स्मार्ट सिटी आपले योगदान देत आहे. अमृत महोत्सव अंतर्गत वर्षभर कार्यक्रम सुरू राहणार आहेत. यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे असे प्रतिपादन महानगरपालिका प्रशासकांनी केले.
यावेळी औरंगाबद शहरात सुरु असलेल्या आणि सक्रिय असलेल्या प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. तसेच यात आणखी भर घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याच आवाहनही केले.