वैजापुरात कोरोनाची संख्या वाढतेय… पुढचे तीन महिने खबरदारी घेणे आवश्यक, महापालिकेचा इशारा

| Updated on: Sep 21, 2021 | 1:37 PM

औरंगाबादच्या शेजारील जिल्हा अहमदनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्येही रुग्णांची संख्या जास्त दिसून येत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर आणि इतर ग्रामीण परिसरालाही धोका आहे.

वैजापुरात कोरोनाची संख्या वाढतेय... पुढचे तीन महिने खबरदारी घेणे आवश्यक, महापालिकेचा इशारा
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

औरंगाबाद: मागील एक महिन्यापासून शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले होते. त्यामुळे गणेशोत्सवदेखील उत्साहात पार पडला. या काळात सार्वजनिक गणेशमंडळांच्या ठिकाणी नागरिकांनीही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत गर्दी करणे टाळले. याच प्रकारे येणाऱ्या काळातही खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. कारण दसरा- दिवाळी हा सणासुदीचा काळ म्हणजेच पुढील तीन महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यातच जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूरमध्ये (Gangapur and Vaijapur in Aurangabad) रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरवासियांनी योग्य ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे (Aurangabad Municipal Corporation) करण्यात येत आहे.

नगर जिल्हा, तसेच वैजापूर-गंगापुरात प्रमाण जास्त

औरंगाबाद जिल्ह्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती प्रमाणास बसू शकतो, याबद्दलही प्रशासकीय यंत्रणा अंदाज बांधत आहे. कारण औरंगाबादचा शेजारचा जिल्हा असलेल्या अहमदनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्येही रुग्णांची संख्या जास्त दिसून येत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर आणि इतर ग्रामीण परिसरालाही धोका आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शहराच्या तुलनेत वैजापूरमधील रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. त्याखालोखाल गंगापूरचा क्रमांक लागतो.
म्हणूनच पुढील महिनाभर नागरिकांनी जास्त काळजी घेणे अपेक्षित आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

तिसरी लाट दीडपट अधिक धोकादायक ठरू शकते

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी यांची 18 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. त्यात मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी केंद्रीय अधिकाऱ्यांनी तिसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या दीडपटीने जास्त असण्याची शक्यता गृहित धरून तयारी करा, अशा सूचना महापालिकेला दिल्या.

70 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा आवश्यक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल झाले. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरेसा साठा तयार ठेवण्याच्या सूचना केंद्रिय अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. दुसऱ्या लाटेतील स्थिती पाहता, शहरात कायम 70 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध राहणे आवश्यक आहे. मेल्ट्रॉन, पदमपुरा कोव्हिड सेंटर, गरवारे कोव्हिड सेंटर आणि 784 ऑक्सिजन सिलिंडर असे एकूण 15 मेट्रिक टन ऑक्सिजनची सुविधा या महिनाअखेर होईल. तसेच घाटी, जिल्हा रुग्णालय, इतर खासगी रुग्णालयांचे मिळून 110 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शहरात कायम उपलब्ध असेल, अशी माहिती डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

इतर बातम्या- 

Corona Cases In India | देशात नव्या कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा घट, सक्रिय कोरोनाग्रस्तांमध्येही घसरण

नाशिक पुन्हा गॅसवर; कोरोना रुग्णांत वाढ, हजाराचा टप्पा ओलांडला