औरंगाबादः महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले होते. महापालिकेकडून जवळपास महिनाभरापासून आराखडा तयार करण्याकरिता मुदतवाढ मागितली जात होती. अखेर बुधवारी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने आराखडा सादर करण्यात आला. किरकोळ दुरुस्तीनंतर हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडून मंजूर केला जाईल.
नव्या प्रभाग रचनेनुसार, शहरातील वॉर्डांची संख्या 126 आणि प्रभागांची संख्या 42 होईल. एका प्रभागात तीन वॉर्डांचा समावेश असेल. प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम झाल्यानंतर आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. ओबीसी आरक्षण नसल्यामुळे पूर्वी जेवढे वॉर्ड ओबीसी महिला आणि पुरुषांसाठी राखीव होते, ते वॉर्ड आता खुल्या प्रवर्गात राहतील, असे सध्या तरी चित्र आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्या संस्थांमध्ये ओबीसींचे 27 टक्के आरक्षण रद्द केल्याचा परिणाम औरंगाबादमध्येही पहायला मिळाले. औरंगाबादमध्ये 27 टक्क्यांनुसार नव्या रचनेत 40 वॉर्ड ओबीसींसाठी राखीव होते. मात्र त्यांचे आरक्षण रद्द केल्यामुळे या जागा खुल्या प्रवर्गात शामील होतील.
दरम्यान अमरावती येथे प्रभाग रचनेच्या आराखड्याची गोपनीयता भंग झाल्याने दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून गोपनीयता भंग होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. प्रभाग रचना आराखडा सादर करण्याची मुदत 6 डिसेंबर रोजी संपली. त्यानंतर मनपा प्रशासनाकडून उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे, नगर रचनाचे अधिकारी कपाळे आणि आणखी एक कर्मचारी अशा तीन जणांच्या पथकाने मुंबई येथे जाऊन राज्य निवडणूक आयोगाकडे आराखडा सादर केला. मात्र, या आराखड्याविषयी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली आहे.
इतर बातम्या-