औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकारने औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर (sambhajinagar) करण्याचा निर्णय घेतलाआहे. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली नाही. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात औरंगाबादेत नामांतर विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. नामांतराची ही लढाई आता कोर्टात लढण्याची समितीची तयारी असतानाच आणखी एक अजब प्रकार समोर आला. गूगल (Google) वेब पोर्टलवर औरंगाबाद शहराचे नाम बदलून संभाजीनगर करण्यात आले आहे. केंद्र सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नसताना गुगलने परस्पर हे बदल केल्याने नामातंरविरोधी समितीतील सदस्यांचा संताप झाला आहे. दोन दिवसांपासून सोशल मीडियावरही एसटी महामंडळाच्या बसेसवर नामांतराचे फलक फिरत आहेत. औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय पक्षही श्रेयवादाचे राजकारण करत आहेत. मात्र नामांतरालाच आक्षेप घेणाऱ्या समितीने आता अधिक आक्रमक होण्याचे ठरवले आहे. गूगलविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याच्या निर्णयाविरोधात केंद्रीय संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची कार्यकारिणी घोषित झाली आहे. समितीच्या अध्यक्षपदी खालेद अहमद, उपाध्यक्ष सय्यद रफिक अहमद, उपाध्यक्ष अय्युब खान, सचिव अबुबकर रेहबर, सहसचिव डॉ. सोगेल झकिउद्दीन, कोषाध्यक्ष हसन पटेल यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी हिशाम उस्मानी, अय्युब जहागीरदार, इलियास किरमाणी, जमीर अहमद कादरी, नईम खान, शेक जलील, अब्दुल मोहिद हशर, शफिक अहमद, आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
औरंगाबादचे नामांतर करण्याविरोधी ही समिती योग्य पाऊले उचलत असून सर्व नामांतर विरोधी नेत्यांनी या समितीत शामिल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या समितीने 1996 मध्ये न्यायालयीन लढाई लढली होती. अॅड. एम. ए. लतीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंबंधीची याचिका दाखल केली होती. समितीने सर्वोच्च न्यायालयातून नामांतरावर स्टे ऑर्डर आणली होती. अॅड. कमरुद्दीन व कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात हा खटला चालवला होता. या समितीच्या समन्वयाशिवाय कुणीही न्यायालयात जाऊ नये, अशी विनंती समितीने केली आहे. सध्या तरी गूगलविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी समितीने पुढची पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
Can @Google please explain on what basis have you changed the name of my city Aurangabad in your map! You owe an explanation to the millions of citizens with whom this mischief has been played. pic.twitter.com/yB2r2VFjlz
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) July 19, 2022
गूगल पोर्टलवर औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची खोडसाळ कृती नेमकी कुणी केली आहे, याचा शोध घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी दिली आहे. गूगलने कोणत्या अधिकारातून हे बदल केलाय, असा सवाल खा. जलील यांनी ट्विटरद्वारे केला आहे.