औरंगाबादः शहरातील क्रांती चौकात (Aurangabad kranti chauk) बसवण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj Statue) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पुतळा अखेर आज औरंगाबाद शहरात दाखल होत आहे. शुक्रवारी तो पुण्याहून औरंगाबादकडे येण्यासाठी रवाना झाला. शिल्पकार दीपक थोपटे यांच्या नऱ्हे येथील स्टुडिओत सकाळी पूजन करून नंतर दोन क्रेनच्या मदतीने हा पुतळा 16 चाकी आणि 40 फूट लांब ट्रकमध्ये विराजमान करण्यात आला.
औरंगाबादच्या क्रांती चौकात उभारण्यात येणारा हा पुतळा देशातील इतर अश्वारुढ पुतळ्यांपेक्षा सर्वाधिक उंचीचा आहे. या पुतळ्याची एकूण उंची 25 फूट आहे तर लांबी 21 फूट आहे. त्यामुळे एवढ्या उंचीच्या पुतळ्याचा पुण्याहून औरंगाबादेत थेट प्रवास करणे शक्य नसल्याने पुतळ्याचे सुटे भाग करून ते शहरात आणले जातील. महाराजांच्या पुतळ्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, हा यामागील उद्देश आहे. तसेच आज रविवारी शहरात दाखल झाल्यानंतर ते भाग एकत्र जोडले जाऊन महाराजांचा भव्य उंचीचा पुतळा तयार करण्यात येईल.
दरम्यान, आज शहरात पुतळ्याचे आगमन झाले तरी तो तसाच झाकून ठेवला जाईल. 10 फेब्रुवारी रोजी त्याचे अनावरण करण्याची तयारी शहरात सुरु आहे. पुतळा पुण्याहून औरंगाबाद येथे आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च एक ते सव्वा लाख रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवाजी महाराजांचा हा पुतळा 25 फूट उंच असून त्याची लांबी 21 फूट एवढी आहे. पुतळ्याचे वजन सुमारे 8 टन आहे. तर पुतळ्या भोवतीचा क्रांती चौकातील चौथरा 31 फुटांचा आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत 3 कोटी 53 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. पुतळ्याभोवतीचा चौथरा आणि त्याभोवतालची सुशोभीकरणाची कामे 9 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती शहर अभियंते सखाराम पानझडे यांनी दिली. या चौथऱ्याभोवती विविध शिल्प, म्युरल्स, कारंजे आदींची कामे वेगात सुरु आहेत.
इतर बातम्या-