औरंगाबादः राज्यभरात अंगणवाडीच्या माध्यमातून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना पोषण आहार पुरवला जातो. मात्र औरंरगाबादमधील वाळूज परिसरातील एका अंगणवाडीतील बालकाला दिलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळून आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाद्वारे या पोषण आहाराचा पंचनामा करण्यात आला.
28 डिसेंबर रोजी वाळूज गावातील अंगणवाडी क्रमांक 1 येथून लाभार्थी बालकांना पोषण आहाराची पाकिटं वाटप करण्यात आली. यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्या विद्या जोशी यांनी आराध्यक्षा अहिरे
हिच्या पालकाकडे पोषण आहाराची पाकिटे दिली. आराध्याच्या शेजारीच राहणाऱ्या अन्य दोघांचीही पाकिटं देण्यात आली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास पालकांनी आहाराची पाकिटं फोडली असता, त्यातील गव्हाच्या पाकिटात मृत उंदीर सडलेल्या अवस्थेत आढळून आला. पालकांनी तत्काळ अंगणवाडीच्या दिशेने धाव घेतली.
महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कोमल कोरे यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका सी.एच.खोचे यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. पर्यवेक्षिका खोचे यांनी अंगणवाडीला भेट देऊन पोषण आहाराची पाकिटे फोडून पाहिली. मात्र दुसऱ्या कुठल्याही पाकिटात गैरप्रकार आढळला नाही.
मात्र या प्रकारामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या धान्यामुळे एखाद्या बालकाच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न लाभार्थी पालकांनी उपस्थित केला.
इतर बातम्या-