औरंगाबादः लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या आपल्या स्टेशनवर देखभाल दुरुस्तीसाठी थांबतील आणि प्रवाशांची आवक-जावक वाढेल. पर्यायानं जिल्ह्याचा विकास (Development) होईल, असा उद्देश ठेवत रेल्वेची पीटलाइन (Railway Pitline) औरंगाबादमध्ये विकसित करायची की जालन्यात हा वाद सुरु झाला आणि अखेर अनेक महिन्यानंतर यावर पडदा पडला. हा वाद सुरु होता भाजपच्या दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये. औरंगाबादचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) आणि जालन्याचे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve). कराडांनी आधी औरंगाबादेत रेल्वेच्या पीटलाइनची घोषणा केली. यासाठी चिकलठाणा येथील जागेचा प्रस्तावही दिला. मात्र मध्येच खोडा घालत दानवेंनी ही पीटलाइन जालन्यात होईल, अशी घोषणा केली. औरंगाबादची पीटलाइन पळवल्याचा आरोप दानवेंवर झाला. रेल्वे प्रवासी संघर्ष समितीने औरंगाबादमध्येच पीटलाइन होण्याचा आग्रह धरला. हा वाद रेल्वे मंत्र्यांपर्यंत गेला. अखेर जालन्याप्रमाणेच औरंगाबादमध्येही पीटलाइन होईल, अशी घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामुळे दोन मंत्र्यांमधील या वादावर पडदा पडल्याचं बोललं जात आहे.
प्रवासी रेल्वे गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी औरंगाबादेत ओपन पिटलाइन उभारण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 29 कोटी 94 लाख 26 हजारांचा निधी मंजूर केल्याचे आदेश रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक शैलेश सिंग यांनी नुकतेच काढले. रेल्वेच्या अंब्रेला योजनेत या कामाचा समावेश करण्यात आला आहे.