औरंगाबाद: गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून अनोळखी महिलेला अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या इसमाला औरंगाबादेतील पुंडलिक नगर पोलिसांनी (Aurangabad Police ) जेरबंद केले आहे. आधी या इसमाने महिलेला चांगले मित्र बनू असे म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मात्र तिने या मैत्रीला नकार दिल्यानंतर त्याने वारंवार अश्लील व्हिडिओ आणि चॅटिंग सुरु केली. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत संबंधित इसमाच्या मुसक्या आवळल्या. महिलेला त्रास देणाऱ्या व्यक्तीचे नाव शहबाज अन्सारी वाहेद अन्सारी (30, रा. शबाना हॉस्पिटलसमोर शहाबाजार) (Shahbaz Ansari wahed Ansari) असे आहे.
संबंधित प्रकरणात 35 वर्षीय महिलेने पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. 29 ऑगस्ट रोजी फेसबुक मॅसेंजरवर अनोळखी व्यक्तीने तिला मॅसेज टाकला होता. आपण चांगले मित्र बनूत, अशी विनंती त्यात करण्यात आली होती. मात्र फिर्यादीने त्याला उत्तर दिले नाही. त्यानंतर आरोपीने 30 ऑगस्ट ते 19 सप्टेंबरपर्यंत फिर्यादीच्या मॅसेंजरवर अश्लील मॅसेज करण्यास सुरुवात केली. तसेच तो अनेक अश्लील व्हिडिओ देखील टाकू लागला. संबंधित महिलेला या इसमाने अनेकदा व्हिडिओ कॉल करून मानसिक त्रास देण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुंडलिक पोलिसांनी तपास केल्यानंतर संबंधित इसम हा ऑनलाइन आधारकार्ड करून देण्याचा व्यवसाय करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यानंतर त्याची चौकशी केली. तेव्हा माझा मोबाइल कुणीतरी हॅक केलाय, अशी थापही या इसमाने मारली. पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त करून तपासला असता, आरोपीनेच फिर्यादीला अश्लील व्हिडिओ टाकल्याचे स्पष्ट झाले. महिलेला त्रास देणाऱ्या व्यक्तीचे नाव शहबाज अन्सारी वाहेद अन्सारी (30, रा. शबाना हॉस्पिटलसमोर शहाबाजार) असे आहे. आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी सोमवारी 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शहरातील दुसऱ्या एका घटनेत 18 सप्टेंबर रोजी रिक्षात लहान मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी रिक्षाचालक नागेश सखाराम शिंदे व एका अनोळखी व्यक्तीने कामगार चौकातून रस्त्याने जात असलेल्या एका बालिकेला बळजबरीने रिक्षात बसवले. तेथून कामगार चौक परिसरातील कॅफेजवळ गेल्यानंतर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मुलीने याबाबत वाच्यता केल्यास आई-वडिलांना ठार मारण्याची धमकीही दिली. यावेळी मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिला त्यांनी सोडून दिले. घरी पोहोचल्यानंतर मुलीने संबंधित घटना सांगितली. या प्रकरणी बालिकेने पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी नागेश सखाराम शिंदे व एका अज्ञाताविरोधात पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मीरा चव्हाण करत आहेत.
इतर बातम्या-
लेडिज गाऊन घरफोडी करणारा चुन्नू पोलिसांच्या जाळ्यात , औरंगाबादच्या गुन्हेशाखेची कारवाई