Aurangabad | मनपाच्या लाचखोराकडे तब्बल 43 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी आणि रोकडही, कुणाचा वरदहस्त? चामलेंचे ‘साहेब’ कोण?

| Updated on: May 01, 2022 | 10:25 AM

संजय चामले हे महापालिकेच्या नगर रचना विभागात शाखा अभियंता आहेत. मात्र त्यांच्याकडे गुंठेवारी कक्षाची जबाबदारी देण्यात आली होती. सातारा-देवळाई भाग त्यांच्याकडे होता.

Aurangabad | मनपाच्या लाचखोराकडे तब्बल 43 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी आणि रोकडही, कुणाचा वरदहस्त? चामलेंचे साहेब कोण?
Follow us on

औरंगाबादः महापालिकेच्या गुंठेवारी विभागाचा प्रमुख तथा शाखा अभियंता संजय चामले (Sanjay Chamle) याला लाचलुचपत खात्याच्या पथकाने शुक्रवारी पकडल्यानंतर त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. एसीबीच्या पथकाने (ACB team) केलेल्या या कारवाईत चामले याच्या घरी तब्बल 43 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी, 3 लाख 78 हजार रुपये रोकड मिळाली. तसेच काही प्रॉपर्टीची कागदपत्रही आढळली. चामलेकडे आणखी किती घबाड मिळू शकते, याची चाचपणी एसीबीकडून करण्यात येत आहे. लेआऊट मंजूर करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना चामले याला घरातच पकडण्यात आले होते. शुक्रवारी पकडल्यानंतर शनिवारी संध्याकाळपर्यंत त्याच्या घराची झाडाझडती घेणं सुरु होतं. चामलेच्या घरी एवढं मोठं घबाड सापडल्यानंतर याच्यावर कुणाचा तरी वरदहस्त नक्की आहे, असा संशय एसीबीला आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचं आव्हान एसीबीसमोर आहे.

कोण आहे संजय चामले?

संजय चामले हे महापालिकेच्या नगर रचना विभागात शाखा अभियंता आहेत. मात्र त्यांच्याकडे गुंठेवारी कक्षाची जबाबदारी देण्यात आली होती. सातारा-देवळाई भाग त्यांच्याकडे होता. या भागातील ले आउटला मंजुरी देणे, बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्रांबद्दल निर्णय घेणे आदी कामे वरिष्ठांच्या आदेशाने तो करत होता. यातून चामलेने खूप कमाई केल्याची चर्चा आहे.

चामलेंचे ‘साहेब’ कोण?

एसीबीच्या पथकाने कारवाई केल्यानंतर चौकशीत चामले यांने ‘साहेबांचेही पहावे लागते, म्हणून इतके पैसे घेतो..’ असं सांगितल्याची माहिती कळालीय. त्यामुळे चामलेचे साहेब नेमके कोण कोण आहेत, याचा तपास घेतला जाणार आहे. त्यामुळे चामले याच्या पुढील चौकशीत अनेक नावे उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही मंडळी हे प्रकरण मिटवण्यासाठी धडपड करीत असल्याचीही चर्चा आहे. एसीबीने चौकशी केल्यास काही बडे अधिकारी आणि राजकीय मंडळी दलाल यात अडकण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास अधीक्षक राहूल खाडे, निरीक्षक विकास घनवट, अनिता इडबोने आदी टीम करत आहे.