औरंगाबादः जिल्ह्यातील अप्पर तहसील कार्यालयात कार्यरत तलाठी लक्ष्मण बोराटे यांच्या आत्महत्येच्या तपासाला रोज नवे वळण मिळत आहे. रविवारी 28 नोव्हेंबर रोजी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तणावामुळे हा निर्णय घेतल्याचे लिहून ठेवले आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलिसांचे एक पथक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. मात्र त्याच दरम्यान सदर लक्ष्मण बोराटे आणि सध्या कार्यालयात कार्यरत असलेले लिपीक डी.एस. राजपूत या दोघांविरोधात 2018 साली एका महिला कर्मचाऱ्याने विशाखा समितीअंतर्गत तक्रार दाखल केल्याची माहितीही उघड झाली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
बोराटे यांच्या सुसाइड नोटमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील जुनी प्रकरणे बाहेर निघू लागली आहेत. ज्या महिलेने बोराटे व राजपूत यांच्याविरोधात तक्रार केली होती, ती महिला मागील दोन वर्षांपासून गैरहजर असल्याचे अधिकाऱ्यांकडून समजले. मात्र ती विनाअर्ज रजेवर का आहे, याची खबरही संबंधित विभागाने घेतलेली नाही.
दरम्यान, बोराटे यांच्या सुसाइड नोटमध्ये ज्या 13 जणांची नावं आहेत, त्यात सदर महिला कर्मचाऱ्याचेही नाव असल्याची चर्चा आहे. मात्र दोन वर्षांपासून ती गैरहजर असताना तिचे नाव आत्महत्येच्या चिठ्ठीत कसे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. तसेच पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबांमध्येही प्रचंड विरोधाभास असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता तलाठी लक्ष्मण बोराटे यांच्या आत्महत्येचा तपासात पोलिसांच्या हाती सत्य कसे सापडेल, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या-