औरंगाबादः पाणी प्रश्नाने (water issue) पेटलेल्या औरंगाबादकरांना आता नवी पाणीपुरवठा (Water Supply Scheme) योजना कधी पूर्ण होतेय, याचीच प्रतीक्षा आहे. जीर्ण झालेल्या जुन्या पाणीपुरवठा योजनेतूनच विविध उपाययोजना करीत महापालिका प्रशासक शहरवासियांच्या (Aurangabad city) समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शहरातील 1680 कोटींची नवी पाणीपुरवठा योजनेचं काम अत्यंत संथ गतीनं सुरु आहे. ही योजना आणि सातारा देवळाईसाठीच्या ड्रेनेजलाइन योजनेसाठी केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेतून निधी मिळावा, यासाठी स्थानिक प्रसासन व लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार, शहराचे रँकिंग चांगले असेल तरच या योजनेचा निधी मिळू शकेल. त्यामुळे आता मनपा प्रशासन व नागरिक स्वच्छतेबाबत किती जागरूक राहतात, यावर निधीचे भवितव्य अवलंबून असेल.
राज्य शासनाने शहरासाठी 1680 कोटींची पाणीपुरवटा योजना मंजूर केली आहे. या योजनेचं काम सुरु झालं आहे, मात्र अत्यंत संथ गती असल्यामुळे योजना रखडतेय, तसा खर्चही वाढतोय. लोखंड आणि इतर साहित्याचे भाव वाढल्याने योजनेच्या खर्चात नुकतीच 400 कोटींची वाढ झाली आहे. मात्र निधीअभावी योजना रखडू नये, राज्य शासन व महापालिकेवरील बोजा कमी व्हावा, यासाठी केंद्राच्या अमृत-२ योजनेत तिचा समावेश करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.