औरंगाबादः औरंगाबादमधील व्हेरॉक इंजिनिअरिंग (varroc engineering)कंपनीने आपला चारचाकींच्या (Four Wheeler) लाइटचा व्यवसाय (Business) विकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने फ्रान्समधील प्लास्टिक ओनियम एसई कंपनीशी करार केला आहे. या कराराअंतर्गत 600 दशलक्ष युरो म्हणजेच 48 अब्ज 29 कोटी 58लाख रुपयांत चारचाकींच्या लाइटचा व्यवसाय ओनियमला दिला आहे. व्हेरॉक कंपनीने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार अमेरिका आणि युरोपमधील कंपनीची गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे कंपनीचे जे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक व्हेइकल आणि दुचाकींचे व्यवसाय आहेत, त्यातच अत्याधुनिक होण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. फ्रान्सच्या कंपनीशी झालेल्या करारामुळे औरंगाबादच्या प्लँटवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही कंपनीच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
फ्रान्सच्या प्लास्टिक ओनियम एसईने व्हेरॉकचा लायटिंग सिस्टिमचा व्यवसाय विकत घेतलाय. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लाउरेंट फेवरे म्हणाले, व्हेरॉक कंपनीचा लायटिंग सिस्टिमचा व्यवसाय आम्हाला मिळणे, हे आमच्या व्यवसाय वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आमची लायटिंगची श्रेणी विस्तृत होईळ. याचा फायदा उद्योगात होईल. व्हेरॉकने बाजारात विश्वसनीयता निर्माण केली आहे. त्यामुळे याचा लाभ आम्हालाही मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
व्हेरॉक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तरंग जैने म्हणाले, येत्या काळातील आव्हानांसाठी कंपनी तयार होत आहे. भविष्यात ईलेक्ट्रिक व्हेइकल हा सर्वात महत्त्वाचा उद्योग आहे. त्यामुळे आता कंपनी दर्जेदार इलेक्ट्रिक उत्पादनांवर भर देणार आहे. अमेरिका आणि युरोपमधील चारचाकी लाइट उद्योगातील निर्गुंतवणूक हा व्हेरॉकसाठी अत्यंत सन्मानजनक करार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या करारामुळे औरंगाबादच्या प्लांटवर काहीही परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.