औरंगाबादः येत्या 23 मे रोजी औरंगाबादमधील पेटलेल्या पाणी प्रश्नावर (Water issue) भाजपतर्फे तीव्र आंदोलनाची तयारी सुरु आहे. खुद्द विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devednra Fadanvis) हे या मोर्चानं नेतृत्व करत आहेत. मनसेनंही(MNS) पाणी संघर्ष यात्रेला सुरुवात करत पाणी प्रश्नावर सत्ताधारी शिवसेनेला तोंडावर पाडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक वर्षांपासून विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर महापालिकेतर्फे वेगाने उपापयोजना आखण्याचे काम सुरु आहे. गेल्याच आठवड्यात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादची पाणीपट्टी 4050 वरून निम्मीच म्हणजे 2 हजार रुपयांवर करण्याचा निर्णय घेतला. नवी पाणीपुरवठा योजना सुरळीत होईलपर्यंत ही सुधारणा लागू होईल, असेही सांगण्यात आले. महापालिकेतर्फे अतिरिक्त पाणीपुरवठ्याचीही सोय करण्यात येत आहे. आता स्मार्ट सिटी तर्फे नागरिकांसाठी जलबेल अॅप लाँच करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाजपने यापूर्वी ज्या भागात आंदोलन केले, त्याच म्हणजेच सिडको एन-5 मधील जलकुंभावर अवलंबून असलेल्या वसाहतींनाच सध्या हे अॅप वापरता येणार आहे. त्यामुळे या भागातील भाजपाचा प्रभाव कमी करण्याचे मनपाचे प्रयत्न आहेत, असाच अर्थ त्यातून निघतोय.
येत्या 23 मे रोजी भाजपतर्फे औरंगाबादेत मोठं आंदोलन केलं जाणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चात शहरातील पाणी प्रश्नाने ग्रस्त असलेल्या महिला व नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन भाजपचे आमदार अतुल सावे आणि डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. यावेळी 25 हजार महिला रिकामे हंडे घेऊन सहभागी होतील, असा विश्वास भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, औरंगाबाद मनसेतर्फेही पाणी प्रश्नावर आंदोलन छेडण्यात आलं आहे. शहरातील वॉर्डा-वॉर्डात फिरून मनसेचे पदाधिकारी नागरिकांकडून पाणी समस्येवर पत्र लिहून घेत आहेत. अशी 25 हजार पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत.