औरंगाबादः शहरातील सातारा परिसराला (Satara Parisar) जोडणारा शिवाजी नगर (Shivaji Nagar) रेल्वे गेटच्या रस्त्यावर नागरिकांना प्रचंड वाहतुक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. येथील रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र या परिसरातील जमीन संपादन प्रक्रियेत हा प्रकल्प अडकला आहे. भुयारी मार्गासाठी (Sub way) विकास आराखड्यात नसलेल्या आणि अस्तित्वात असलेल्या 24 मीचर रस्त्यासह भूसंपादनाचा सुधारीत पर्स्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यास मनपाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी चर्चा आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी दोन वेळा पत्र देऊनही मनपा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या प्रकारामुळे भुयारी मार्गाचे प्रकरण रखडले आहे.
शिवाजी नगर भुयारी मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने भूसंपादनासाठी 1 कोटी 81 लाख रुपयांचा निधी मनपाकडे जमा केला आहे. हा निधी मनपाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला. त्यानुसार, त्रिसदस्यीय समितीचे सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूसंपादन अधिकारी व्ही.ही. दहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुर्यवंशी, मनपा नगररचाना विभागाचे संजय चामले यांनी भुयारी मार्गाच्या जागेची पाहणी केली. यावेळी देवळाई चौक ते रेल्वेगेट दरम्यान दोन्ही बाजूंनी भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार दीडशे फूट लांब आणि 24 मीटर रुंद याप्रमाणे भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यावेळी विकास आराखड्यात 24 मीटर रस्त्याचा समावेश नसल्यामुळे अस्तित्वात असलेल्या रस्त्यासाठी जमिनीचे संपादन करण्यासाठी प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या प्रक्रियेसाठी मनपाकडून भूसंपादनाचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवणे आवश्यक आहे. परंतु मनपा नगरचना विभागाने दोन ओळींचा संदर्भ देत प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन वेळा सुधारीत प्रस्ताव पाठवावा, असे पत्र मनपाला पाठवण्यात आले. मात्र मनपाने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे सध्या तरी शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया रखडली आहे. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न रखडलेला राहील.