औरंगाबादः महापालिका आणि नगरपालिकेच्या धर्तीवर वाढीव लोकसंख्येनुसार जिल्हा परिषदेच्याही गट आणि गणांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची फेररचना करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले आहे. हा आराखडा तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात फेर रचनेचा आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे. नव्या रचनेनुसार, औरंगाबाद, सिल्लोडमध्ये प्रत्येक 2 तर फुलंब्री, पैठण, वैजापूरमध्ये प्रत्येकी 1 गट तसेच कन्नडमध्ये किंवा खुलताबाद तालुक्यात एक गट वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
महापालिका, नगरपालिकेच्या धर्तीवर 2011 मधील लोकसंख्येत 10 टक्के वाढ गृहत धरून जिल्हा परिषदेतील गट आणि पंचायत समितीतील गणांची फेररचना करण्याचे काम प्रगती पथावर आहे. जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत, समित्यांचे 16 गण वाढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदींनुसार, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची मुदत संपण्यापूर्वी त्यांची सार्वत्रिक निवडणूक घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करत जिल्हाधिकाऱ्यांना 18 नोव्हेंबर 2021 रोजी पत्र पाठवले होते. त्यानुसार, जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता हा फेररचना अहवाल राज्य शासनासमोर सादर होईल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल.
नव्या रचनेनुसार, जिल्हा परिषदेतील गटांतील गावांची संख्याही कमी होईल. पूर्वी एका गटात 23 ते 25 गावांचा समावेश होता. आता गटाच्या रचनेसाठी 25 ते 30 हजार मतदारसंख्येचा एक गट हा निकष लावण्यात येत आहे. त्यामुळे गटातील गावांची संख्याही 21 ते 23 पर्यंत असेल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
याआधीच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 62 झाली होती. तर गणांची संख्या 124 एवढी होती. आता यामध्ये 8 गट आणि 16 गणांची वाढ झाली आहे. म्हणजेच जिल्हा परिषदेत 62 ऐवजी 70 गट असतील तर 124 ऐवजी आता 140 असतील. परिणामी यंदा जिल्ह्यात 8 वाढीव जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समितीचे सदस्य निवडले जातील. सध्या वाढीव लोकसंख्येनुसार एका गटात 35 हजार 703 एवढी लोकसंख्या असेल .
इतर बातम्या-