औरंगाबाद: मागील दहा दिवसांपासून एकावर एक गुन्हे करत सुसाट सुटलेला कुख्यात गुंड टिप्या मंगळवारी दुपारी थेट न्यायालयात (Aurangabad District court) येऊन धडकला. मात्र त्याच्या शोधात असलेले तीन-तीन पोलिसांच्या पथकाला, याची जराही कुणकुण लागली नव्हती, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 28 सप्टेंबर रोजी कुख्यात गुंड टिप्या उर्फ शेख जावेद शेख मकसूद थेट न्यायालयात हजर झाला. पोलिसांनी (Aurangabad Police) त्याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवला होता. त्यामुळे घाबरून तो शरण आल्याचे म्हटले जात आहे. 17 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता शिवाजी नगर भाजीमंडईमध्ये एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सीताराम केदारे (Sitaram Kedare) एका गुन्ह्याच्या तपासासाठी गेले असताना टिप्याने या परिसरात त्यांच्यासह आणखी एका महिलेच्या अंगावर चारचाकी घालून त्यांचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. फरार होण्यासाठी एका कारागृह रक्षकाचे अपहरण करून त्यांच्याकडून दोन प्लॉट आणि एक लाख रुपये रक्कमही साथीदारांच्या मदतीने हडप करण्यात टिप्याचीच मदत होती. त्यानंतर पोलीस टिप्याचा कसून शोध घेत होते.
मागील सहा दिवसांपासून पोलिसांनी टिप्याचे नातेवाईक, मित्रांची कसून चौकशी सुरु करून त्याची सर्व रसदच बंद केली होती. ‘तुम्ही त्याला हजर करा, नाही तर आम्हाला सापडल्यास काही खरे नाही’ असा संदेशच अप्रत्यक्षरित्या टिप्याच्या कुटुंबापर्यंत पोलिसांनी पोहोचवला होता. त्यानंतर टिप्या स्वतःहून आईसोबत न्यायालयात हजर झाल्याची माहिती मिळाली आहे.
मंगळवारी दुपारी टिप्या दुचाकीवरून न्यायालयात हजर झाला. दुपारी बारा वाजता तो न्यायालयात आईसोबत बसला होता. याची माहिती कळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक न्यायालयात पोहोचले. त्यानंतर टिप्याच्या दोन बहिणी, पुंडलिकनगर पोलिसांचे पथक पोहोचले. इतर गुन्ह्यांत अडकवण्याची भीती वाटल्याने घाबरून टिप्याने शरणागती पत्करली, असे वकिलांमार्फत सांगण्यात आले. त्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. बुधवारी पुंडलिक नगर पोलीस खुनाच्या प्रयत्नात, तर एमआयडीसी सिडको पोलीस अपहरण व लूटमारीच्या गुन्ह्यात त्याच्या स्वतंत्र पोलीस कोठडीची मागणी करतील.
गेल्या काही दिवसांपासून टिप्याच्या मागवर असलेल्या पोलिसांना तो कुठे असेल, याची थोडीफार माहिती होती. स्थानिक गुन्हे शाळा, पुंडलिकनगर पोलीस टिप्याच्या मागावरच होते. तो शरण येण्याचीही कुणकुण पोलिसांना होती. त्यानुसार त्यांनी तयारी केली असती तर न्यायालयात हजर होण्यापूर्वीच त्याला पकडता आले असते. टिप्या मालेगावहून औरंगाबादेत पहाटे किंवा सकाळी दुचाकीवरून आला. दुपारी बारा वाजता तो न्यायालयात पोहोचेपर्यंत पोलिसांना माहिती नव्हती, असे सांगण्यात आले. मात्र या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण आहे. (Aurangabad’s criminal Tipya finally appeared in court himself, police had been searching for the last ten days)
इतर बातम्या-