बीड | 23 डिसेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये मोठी सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली डेडलाईन उद्या संपत आहे. त्यापूर्वी होणारी ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला एक मिनिटाचाही वेळ देणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आजच्या सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊ नये म्हणून प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंगशे चिवटे यांनी सभेपूर्वी जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण जरांगे यांनी आपली भूमिका सोडली नाही. विशेष म्हणजे जरांगे यांची समजूत घालण्यासाठी गेलेल्या बच्चू कडू यांनी जरांगे यांच्या उद्याच्या आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारलाही कानपिचक्या दिल्या. सरकारने शब्द दिले होते. त्यातील काही गोष्टी झाल्या नाही, हे दुर्देव आहे. सरकारने फसगत केली असं आंदोलकांचं म्हणणं आहे. ते साहजिकच आहे. सरकारने शब्द देताना काळजी घ्यायला हवी. आज काही झालं नाही तर आंदोलन होणारच आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
काहीच फलित झालं नाही तर आंदोलन उभं राहील. आम्ही रोखा म्हटलं तरी समाज थोडी ऐकणार आहे. आंदोलन सरकारच्या सोयीचं नसतं. समाज म्हणून न्याय मिळायला हवा, असं सांगतानाच आंदोलक म्हणून मी इथेच थांबणार आहे. आंदोलक म्हणून उद्या आंदोलन झालं तर उद्या आंदोलनात बसेल, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. चांगल्या गोष्टी घडत असतील तर कार्यकर्ता म्हणून मध्यस्थी करेल. तसं करणं आनंदच वाटेल, असंही त्यांनी सांगितलं.
सगेसोयरे या मुद्द्यावरून सुरू असलेल्या घोळावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सगेसोयरे या शब्दावरून माझाही गैरसमज झाला होता. सगेसोयरे म्हणजे वडिलांच्या नात्यातील लोक असा अर्थ मी घेतला होता. पण जरांगे यांचं म्हणणं वेगळं आहे. आईच्या जातीचं सर्टिफिकेट मुलाला मिळावं, अशी त्याांची मागणी आहे. तसं झालं तर आईची जात एका मुलाला आणि बापाची जात दुसऱ्या मुलाला लागेल. त्यामुळे एकाच कुटुंबात दोन जाती तयार होतील, असं बच्चू कडू म्हणाले.
सोयरे म्हणजे सोयरीक. जिथे सोयरीक होईल असं नातं. तेल्यांची तेल्यांसोबत सोयरीक होते. माळ्यांची माळ्यांसोबत सोयरीक होते, कुणबीची कुणब्यासोबत सोयरीक होते, ही सोयरीक. म्हणून आईची जात पोराला लावू शकत नाही. काका, पुतण्या, मामा, मावशी हा सगेसोयरेचा अर्थ आहे. आधी सगेसोयऱ्याची व्याख्या करणं गरजेचं आहे. व्याख्या झाली तर सर्व स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितलं.