बीड: ठाकरे सरकार पडणार असल्याच्या तारखा देणाऱ्या भाजप नेत्यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा, असा घरचा आहेरच पंकजा मुंडे यांनी दिला.
सावरगावच्या भूमीतून पंकजा मुंडे यांची तोफ प्रचंड धडाडली. अत्यंत अवेशात आणि आक्रमकपणे पंकजा मुंडे यांनी आपले मुद्दे मांडले. हे मुद्दे मांडतानाच त्यांनी थेट स्वपक्षीयांनाही जोरदार टोले लगावले. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडणार की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार पडणार नाही. आता यातून बाहेर पडा. विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत लक्ष घाला, असा घरचा आहेरच पंकजा यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपला संकल्पही जाहीर केला. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हार घालणार नाही. ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही, असंही त्यांनी हजारो लोकांच्या साक्षीने जाहीर केलं.
मला सांगा हा मेळावा होईल का नाही? चर्चा होती. माझ्यावर प्रेम करणारे सांगत होते, ताई मेळावा नको. का रे बाबा? म्हणे, सत्ता नाही. सत्ता नाही म्हणून मेळावा नाही? कधी या मेळाव्याने सत्ता बघितली? मुंडे साहेब सत्तेत होते का? लाखो लोक या मेळाव्याला येत होते. पण कसे राजा सारखे राहिलात? सत्ता नाही म्हणून कसं नाही? कुणी म्हणलं ताई अतिवृष्टी झाली, कोरोना आहे. लोकांची मनस्थिती नाही. अरे बाबा अशाच वेळी लोकांना ऊर्जा देण्यासाठी मला हा मेळावा घ्यायचा आहे. अधिकारी विचारायचे ताई किती लोकं येणार? मी म्हणाले मला माहिती नाही. भगवान बाबांचा कार्यक्रम आणि पोलिसांचं नातं जुनचं आहे. आता पाचशे पोलीस असतील तर लोकं किती येणार ते मी काय सांगू बाबा? एवढ्या संख्येने तुम्ही इथे आलात. मला असं वाटतंय की, भगवान श्रीकृष्ण माझ्यासमोर साक्षात आलेत. भगवान श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला विराट रुप दाखवलं तसं मला आज कृष्णाने विराट रुप दाखवलं, असं त्यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
मी काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. पण माझ्या आयुष्यात मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवान बाबांची मूर्ती आहे. या पवित्र स्थानावर उच्चार करायचा नाही, अशा कोणत्याशी शब्दाचा मी उच्चार करणार नाही. या स्थानावर ज्या व्यक्तीवर बोलून सुद्धा भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्याही व्यक्तीचा उल्लेख मला करायचा नाही. आणि अशा कुठल्याही प्रवृत्तीचा मला उल्लेख करायचा नाही, असं सांगून पंकजा यांनी आपल्या भाषणाचा रोख स्पष्ट केला. काही लोकांना वाटतंय मी घरात शांत बसले. ते लोक आज खूश असतील. पण माझा दौरा लिहून घ्या, मी आता 17 ते 20 तारखेपर्यंत दिल्लीत आहे. त्यानंतर मी 23 ते 25 मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात आहे. नंतर 12 डिसेंबरला ऊसाच्या फडामध्ये ऊसतोड कामगारांसोबत जाऊन मी गावागावात संवाद साधणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
प्रीतम मुंडे म्हणाल्या मंडे टू संडे, पब्लिक म्हणाली, गोपीनाथ मुंडे, कुठपर्यंत घुमणार आवाज?
पंकजाताई तुमचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर हे आमदार, खासदार होतील का हो? जानकरांची फटकेबाजी
गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, जानकर म्हणतात, मेलो तरी साथ सोडणार नाही
(bjp says maha vikas aghadi government will fall, pankaja munde says…)