बीड हिंसाचाराचे गुन्हे मागे घेण्यास भुजबळांचा विरोध, मोठा गोप्यस्फोट करत कुणावर फोडलं खापर?

| Updated on: Nov 06, 2023 | 1:45 PM

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे बीडच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या आठवड्यात बीडमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. यावेळी राजकीय नेत्यांची घरे आणि हॉटेल जाळण्यात आली होती. त्यात राष्ट्रवादी आणि समता परिषदेशी संबंधितांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी हिंसाचारानंतरच्या परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

बीड हिंसाचाराचे गुन्हे मागे घेण्यास भुजबळांचा विरोध, मोठा गोप्यस्फोट करत कुणावर फोडलं खापर?
chhagan bhujbal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महेंद्र मुधोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड | 6 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज बीडची पाहणी केली. बीडमध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंसाचार झाला, त्या भागांची पाहणी केली. जयदत्त क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची पाहणी करताना समता परिषदेचे नेते सुभाष राऊत यांच्या हॉटेलचीही पाहणी केली. पोलिसांशी चर्चा करून हिंसाचाराची माहिती घेतली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.

बीडमध्ये मराठा आंदोलना दरम्यान अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या हॉटेलवर दगडफेक करत संपूर्ण हॉटेल पेटविण्यात आले होते. आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी हॉटेलची पाहणी केली. तसेच ॲड.सुभाष राऊत यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.चार तास आधी कल्पना देऊनही पोलीस गाफील राहिले. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करा आणि कोणाचेही गुन्हे मागे घेऊ नका, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ यांनी पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताना सरकारवरही तोफ डागली आहे.

पोलीस अधीक्षकांना कल्पना दिलेली

आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवल्यानंतर मला ज्यावेळी ही घटना समजली त्यावेळी सुभाष राऊत हे माझ्यासोबत मंत्रालयात होते. त्याचवेळी मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून कल्पना दिली होती. सुभाष राऊत यांच्या हॉटेलवर दगडफेक होऊ शकते, असं मी पोलीस अधीक्षकांना चार तास आधी सांगितलं होतं. त्यानंतर चार तासाने हा प्रकार घडला, असा दावा भुजबळ यांनी केला आहे.

तुम्हीच काय ते ठरवा

चार तास वेळ मिळून देखील राऊत यांच्या हॉटेलला पोलीस बंदोबस्त देण्यात आला नव्हता. यातच पोलिसांचे अपयश दिसते. याबरोबरच पोलिसांचा गुप्त वार्ता विभाग ही या प्रकाराची माहिती देऊ शकला नाही. हे अपयश आहे. यात एसआयटी असो की न्यायालयीन चौकशी… काय करायचे ते करा. पण चौकशी करा. या हिंसाचारातील गुन्हे देखील मागे घेऊ नका, असं म्हणत सरकारवरच भुजबळांनी तोफ डागली. बीड हिंसाचार हा सरकार आणि गृहमंत्रालयाचं अपयश आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर तुम्हीच काय ते ठरवा, असं ते म्हणाले.

भुजबळांचा विरोध

दरम्यान, जालन्याच्या वडीगोद्री फाट्यावरून जात असताना भुजबळ यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध केला. मराठा समाजाला ओबसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. मराठा समाजाला मागच्या दाराने आरक्षण दिल्याने ओबीसींवर अन्याय होणार आहे, असं भुजबळ यांनी म्हटलंय.