Maratha Andolan : बाबा, तुझं पोरगं लय भारी आहे; जरांगे पाटील यांच्या वडिलांना मुख्यमंत्री असं का म्हणाले?

| Updated on: Sep 14, 2023 | 12:04 PM

लाठीमाराची घटना दुर्देवी आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. मीही खंत व्यक्त केली. मराठा समाज हा शिस्तप्रिय आहे. शांतता बिगडेल असं काम केलं नाही. त्यामुळे आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.

Maratha Andolan : बाबा, तुझं पोरगं लय भारी आहे; जरांगे पाटील यांच्या वडिलांना मुख्यमंत्री असं का म्हणाले?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जालना | 14 सप्टेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात आल्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे. 17 व्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना सरबत पाजून त्यांचं उपोषण सोडलं. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्या वडिलांनाही ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षण तूर्तास थांबलं आहे. मराठा आंदोलकांकडून राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत त्यांच्या मागण्या मार्गी लावण्याचं आवाहन शिंदे सरकार समोर आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांचं तोंडभरून कौतुक केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडल्यानंतर आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं तोंडभरून कौतुक केलं. एक साधा आणि जिद्दी कार्यकर्ता कसा असतो हे जरांगे पाटील यांना पाहिल्यावर कळतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मी बाबाला सांगितलं मघाशी तुझं पोरगं भारी आहे. तुझा पोरगा स्वत:साठी नाही, पण समाजासाठी लढतोय. तो निस्वार्थी आहे. तो सच्चा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मनोजचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक

मनोजला मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो. त्याने वैयक्तीक फायद्यासाठी कोणताही प्रश्न मांडला नाही. जेव्हा भेटला तेव्हा मराठा समाजाबद्दलच आग्रही भूमिका मांडली. एखादं आंदोलन करणं, आमरण उपोषण करणं आणि जिद्दीने पुढे नेणं, त्याला या महाराष्ट्रात जनतेचा प्रतिसाद मिळणं या सर्व गोष्टी कमीवेळा पाहायला मिळतं. पण ज्याचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असतो त्याच्यामागे जनता उभी राहते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

ये मनोज जरांगे पाटील है कौन?

मी दिल्लीत गेलो. तिथेही मनोजचीच चर्चा,. मला काही लोक म्हणाले, ये मनोज जरांगे पाटील है कौन? मी म्हटलं, वो साधा कार्यकर्ता आहे. ते म्हणाले अरे उसने तो सब को हिला दिया… मनोज मी तुला हे का सांगतोय. कारण तू साधा कार्यकर्ता आहेस म्हणून. अरे तुझी दखल उच्च न्यायालयानेही घेतली आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

लाईन ऑफ अॅक्शन ठरली

मंत्रिमंडळाची बैठक आणि सर्व पक्षीय बैठकीत आम्ही मराठा आरक्षणावर चर्चा केली आहे. या बैठकीत लाईन ऑफ अॅक्शन ठरवली आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे आता हा प्रश्न लवकर मार्गी लावू. तुमचाही एक सदस्य शिंदे समितीत द्या. म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत राहतील. तसेच तुमच्या सूचनांचाही समितीच्या कामकाजात समावेश केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

ओबीसींसारखेच फायदे मिळावे

ओबीसींना जे फायदे मिळत आहेत. ते समाजाला देत आहोत. काही त्रुटी आहेत, त्या दूर करत आहोत. जे आरक्षण गेलं आहे. ते आरक्षण मिळवून देण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

तुमचा माणूस द्या

ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असतील, काहींकडे नसतील त्यांना न्याय देण्यासाठी जस्टीस शिंदे यांची समिती स्थापन केली आहे. त्यांचं काम सुरू झालं आहे. एक बैठक झाली आहे. दुसरी सुरू आहे. मराठा समाज कसा आहे, त्याचं राहणीमान कसं आहे हे तपासत आहे. तुमचा माणूस सोबत दिला तर फायदाच होईल. तुम्ही वेळ दिला आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यावेळेत आम्ही काम करू, असंही त्यांनी सांगितलं.