औरंगाबादः जिल्ह्यात जवळपास 351 जणांनी अनधिकृतरित्या फार्महाऊसचे बांधकाम (Farm House construction) केल्याची माहिती नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून उघड झाली आहे. जिल्ह्यातील (Aurangabad District) 9 तालुक्यांपैकी पाच तालुक्यांमधील ही आकडेवारी आहे. यातील 76 जणांना अप्पर तहसील कार्यालयाने नोटीस बजावून एक कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. तर उर्वरीतांवरही लवकरच कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील चार महिन्यांपासून प्रशासनाने जिल्ह्यात सर्वत्र तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केले. यातून जिल्ह्यातील 9 पैकी पाच तालुक्यांमध्ये 351 फार्महाऊस असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. यात फार्महाऊसचा व्यावसायिक वापर करण्याचे प्रमाण सर्वाधिक औरंगाबाद तालुक्यात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासवावे अनधिकृत फार्महाऊस बांधून त्याचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांनी 76 मालमत्ताधारकांना दंडाची नोटीस बजावली आहे. या मोहिमेत ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत 2 लाख 44 हजार 450 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत फार्महाऊस धारकांना दंडाची रक्कम भरली तरी तो परवाना म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी मालमत्ता धारकांना महसूल प्रशासनाकडे रीतसर अर्ज करून परवानगी मिळवावी लागणार आहे. या परवानगीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. अनधिकृतरित्या फार्महाऊस बांधून त्याचा व्यावसायिक वापर सर्रासपणे सुरु होता. जिल्ह्यात एवढ्या वर्षांपासून अनधिकृत फार्महाऊस, हॉटेल्स कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
इतर बातम्या-