औरंगाबाद: नवरात्रीपासून औरंगाबादच्या बाजारांमध्ये (Aurangabad Market) हळू हळू ग्राहकांचा उत्साह वाढलेला दिसून येत आहे. दोन दिवसांवर दसरा असल्याने कपडा, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल (Automobile industry) तसेच इतर गृहोपयोगी, सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. कोरोनाचे प्रमाणही गेल्या काही दिवसात कमी झाल्याने ग्राहकांची पावले बाजाराकडे वळत आहेत.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर एखादी तरी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे हा मुहूर्त साधण्यासाठी व्यापाऱ्यांनीही तयारी केली आहे. व्यापाऱ्यांनी विविध प्रकारच्या वस्तुंवर उत्तम सवलतीदेखील दिल्याचे दिसून आले आहे.
औरंगाबादच्या कपडा बाजारात काही दिवसांपासून मोठी गर्दी दिसून येत आहे. गुलमंडी. टिळकपथ, पैठणगेट परिसरातील कापड दुकानाच खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. विविध डिझायनर साड्यांसह पारंपरिक साड्यांनाही चांगली मागणी आहे. तसेच रेडिमेड कपड्यांना तरुणाईकडून जास्त मागणी आहे. काही ठिकाणी ब्रँडेड कपड्यांवर डिस्काउंट आणि कोम्बो ऑफर्सदेखील मिळत आहेत.
सराफा बाजारातही चैतन्य संचारल्याचे चित्र आहे. नवनवीन डिझाइनचे दागिने बाजारात आले असून प्रामुख्याने मंगळसूत्र, बांगड्या, चिंचपेटी यासह हलक्या वजनाच्या दागिन्यांची ग्राहकांमध्ये क्रेझ दिसून येत आहेत. अनकट डायमंडसह प्लॅटिनमच्या दागिन्यांचीही मागणी वाढल्याचे चित्र आहे. आज 13 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 47200 रुपये प्रति तोळा एवढा नोंदवला गेला तर एक किलो शुद्ध चांदीचा भाव औरंगाबादेत 64500 रुपये प्रति किलो एवढा दिसून आला. तसेच शहरातील विशिष्ट सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानांमध्ये आकर्षक सवलत दिली जात आहे.
होम अँड किचन अप्लायन्सेसच्या बाजारातही ग्राहकांची जास्त गर्दी दिसून येत आहे. बाजारात रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मिक्सर, मायक्रोवेव्ह, टोस्टर, ज्युसर, रोटी मेकर, वॉटर प्युरिफायरसह लॅपटॉप, मोबाइल, स्मार्ट टीव्ही, होम थिएटरची मागणी वाढली आहे.
वाहन बाजारपेठेतही यंदाच्या दसऱ्यानिमित्त चांगलीच वर्दळ पहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून वाहनांच्या बुकिंगसाठी गर्दी होत आहे. चारचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या यंदा लक्षणीयरित्या वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
इतर बातम्या-
अबब! औरंगाबाद महानगरपालिकेची एकाच दिवसात पावणे दोन कोटी वसुली, संकलनाची मोहीम वेगात