औरंगाबादः फेसबुकवरील (Facebook) शाही भोज थाळीच्या जाहिरातीला भूलल्यामुळे एका व्यक्तीला तब्बल 90 हजारांचा गंडा घातल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. सोमवारी एमआयडीसी सिडको (CIDCO MIDC) पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात फेसबुकवरील जाहिरात पाहून बाय ‘वन गेट टू फ्री’ चे अमिष पाहून संबंधित व्यक्तीला फसवण्यात (Cyber Fraud) आले होते. मात्र आम्ही फेसबुकवर कोणत्याही प्रकारची जाहिरात करत नाहीत, असे औरंगाबादमधील भोज रेस्टॉरंटच्या मालकांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पंढरीनाथ ठोंबरे, हे नारेगाव येथील रहिवासी याप्रकरणी फिर्यादी आहेत. ते स्क्रॅपचा व्यवसाय करतात. त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चिकलठाणा एमआयडीसीतील शाखेत खाते आहे. ते दोन वर्षांपासून क्रेडिट कार्ड वापरतात. 24 सप्टेंबरर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता घरी फेसबुक पहात असताना ‘शाही भोज थाली’ची जाहिरात दिसली. बुकिंगसाठी मोबाइल क्रमांकही दिलेला होता. त्यावर फोन केला असता त्यांनी ऑनलाइन बुकिंगकरिता क्रेडिट कार्डची सर्व माहिती मागितली. ठोंबरे यांनी ती दिली. मोबाइलवर आलेला ओटीपीदेखील सांगितला. त्यानंतर क्रेडिट कार्डमधून 49 हजार 490 रुपये असे दोन वेळा कपात झाले. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. दोन महिन्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
गुगल किंवा फेसबुकवर आलेल्या जाहिरातीला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहान पोलिसांनी केले आहे. ज्या शॉपची जाहिरात आहे, त्या ठिकाणचा अधिकृत मोबाइल क्रमांक असेल तर जाहिरातीची आधी खात्री करावी आणि नंतरच आर्थिक व्यवहार करावा, कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
इतर बातम्या-