दत्तजयंती विशेषः संत एकनाथांनी 12 वर्ष तपश्चर्या केलेली शिळा शुलीभंजन इथे, काय आहे आख्यायिका?

| Updated on: Dec 18, 2021 | 6:50 AM

आज मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा. हा दिवस श्री दत्त जयंती अर्थात दत्त जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने औरंगाबादमधील प्रसिद्ध दत्तस्थान शुलीभंजन या गडाविषयी विशेष माहिती..

दत्तजयंती विशेषः संत एकनाथांनी 12 वर्ष तपश्चर्या केलेली शिळा शुलीभंजन इथे, काय आहे आख्यायिका?
शुलीभंजन गडावरील श्री दत्त मूर्ती
Follow us on

औरंगाबादः शुलीभंजन (Shulibhanjan) हे औरंगाबाद शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेले अप्रतिम निसर्गरम्य आणि धार्मिक स्थळ आहे. दौलताबाद किल्ल्याच्या उत्तरेस शुलीभंजन हे छोटेसे गाव आहे. शुलीभंजन, सुलीभंजन, संत एकनाथ महाराजांचे साधना स्थळ अशा विविध नावांनी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. स्थळाचे धार्मिक महात्म्य जेवढे आहे, तेवढेच येथील निसर्गही अत्यंत आल्हाददायक आहे.

औरंगाबादहून कसे जाणार?

शुलीभंजनचा गड तसा दुर्लक्षित असल्याने येथे पर्यटकांची फार वर्दळ नसते. म्हणून इथे जाण्यासाठी सार्वजनिक वाहनांची सोय नाही. आपल्या खासगी वाहनानेच इथपर्यंत पोहोचावे लागते. औरंगाबादवरून खुलताबादकडे जाताना डाव्या बाजूस एक कमान आहे तेथूनच नाथगड किंवा शुलीभंजन गडाकडे जाण्याचा रस्ता आहे. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातही गडाकडे जाणारा मार्ग अत्यंत मनोहारी भासतो. रस्ता थोडा खराब असला तरीही दाट झाडांच्या परिसरात प्रवेश करत असल्यामुळे ते जाणवत नाही. याच परिसरात कधी कधी मोर, हरिण, कोल्हा, ससे दिसू शकतात. याच मार्गाने पुढे गेल्यावर शुलीभंजन गडावरील श्री दत्तात्रयाच्या सुंदर मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या गाभाऱ्यात दत्तात्रयाची मूर्ती आहे. मंदिराच्या भिंतींवर विविध प्रसंग वर्णन करणारी चित्रे रेखाटलेली आहेत.

शुलीभंजन मंदिर, औरंगाबाद

काय आहे आख्यायिका?

शुलीभंजन आणि तेथील मंदिराचे महात्म्य 15 व्या शतकातील आख्यायिकेवरून स्पष्ट होते. या काळात जनार्दन स्वामी हे मोठे आध्यात्मिक गुरु होते. यादवांचे राज्य संपवून मोघलांचा अंमल महाराष्ट्रात सुरु झाला होता. जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावर किल्लेदाराच्या पदरी कारभारी होते. संत जनार्दन स्वामींची समाधी देवगिरी किल्ल्यावर आहे. याच संत जनार्दन स्वामींना पैठणचे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी गुरु मानले होते. स्वामींनी त्यांना दीक्षा दिली आणि 12 वर्षे शुलीभंजन पर्वतावर तपस्या करण्यास सांगितले. संत एकनाथांनी ज्या शीळेवर बसून ही तपस्या केली, ती शिळादेखील इथे पहायला मिळते.

संत एकनाथांनी याच शिळेवर बसून तपश्चर्या केली, अशी आख्यायिका आहे.

फकिराच्या वेशात श्री दत्तांनी घेतली परीक्षा

असं म्हणतात की, संत एकनाथ महाराजांच्या तपश्चर्येनंतर जनार्दन स्वामी आणि श्री दत्तांनी त्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. हे दोघेही मलंग म्हणजेच फकिराच्या वेळात तिथे आले. तेथे त्यांनी कुत्रीच्या दुधापासून विशिष्ट प्रसाद तयार केला आणि तो संत एकनाथांना खावयास सांगितला. पण त्यांनी नकार दिला. नंतर दत्तांनी त्यांना त्या प्रसादाचे पात्र सूर्यकुंडात धुवून आणण्यास सांगितले. पण साधूसंतांनी दिलेल्या या पात्रातील काही अंश चाखून पहावा, या भावनेने त्यातील प्रसादाचा काही कण संत एकनाथांनी चाखला आणि प्रत्यक्ष श्री दत्तांनी त्रिमूर्तीमध्ये येऊन त्यांना दर्शन दिले. संत एकनाथ महाराजांनी इथे साधना केली म्हणून या ठिकाणाला संत एकनाथांचे साधनास्थळ असेही म्हणतात.

संजीवनी शिळेतून सप्तसूरांची प्रचिती

या परिसरात एक संजीवनी शिळा आहे. या शिळेवर दगडाने आघात केल्यास त्यातून सप्तसूरांची प्रचिती येते. शिळा आतून पोकळ असेल किंवा त्यामागे काही वैज्ञानिक कारणं असतील, पण शिळेवर आघात केल्यानंतर जो मंजुळ ध्वनी येतो, त्याचा अनुभव प्रत्येकाने अवश्य घ्यावा.

शुलीभंजन येथील संजीवनी शिळा

निसर्गप्रेमींनी एकदा तरी भेट द्यावीच

पर्यटनासाठी निघालेले अनेकजण सहसा धार्मिक स्थळांची वाट कमी धरतात. पण या केवळ धार्मिक स्थळ म्हणून याकडे दुर्लक्ष केले तर इथल्या निसर्गाची अनुभूती घेण्याची संधी कदाचित तुम्ही गमवाल. घनदाट झाडींतून वाट काढत शुलीभंजनच्या गडावर जेव्हा पोहोचाल, तेव्हाच इथल्या निसर्गाचा देखणा नजारा अनुभवू शकाल.

शुलीभंजन पर्वतावरील निसर्गाचे विहंगम दृश्य

इतर बातम्या-

भुसावळमध्ये भाजपला भगदाड, 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; नाथाभाऊंच प्रचंड शक्तीप्रदर्शन

मोठी बातमीः OBC आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची भाजपची मागणी, शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात