औरंगाबादः युरोपातील कमालीचा गारठा असह्य होत असल्याने दरवर्षी लाखोंच्या संख्येने विदेशी पक्षी जायकवाडीच्या (Jayakwadi) जलाशयावर वास्तव्यास येतात. मात्र दरवर्षी लाखोंच्या आकड्यात येणारे हे विदेशी पाहुणे यंदा काहीशे एवढेच आले आहेत. वन्यजीव विभागाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी करण्याती आलेल्या पक्षी गणनेत हे वास्तव समोर आले आहेत. एवढंच नाही तर अवघ्या शहरवासियांचं लक्ष वेधून घेणारा मोहक फ्लेमिंगोदेखील (Flamingos) यावर्षी दिसणं दुर्मिळ झालंय. त्यामुळे पक्षीप्रेमींचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.
वन्य जीव विभागाच्या वतीने नुकतीच जायकवाडी, पिंपळवाडी, लामगव्हाण, मावसगव्हाण, बोरगाव, खानापूर या ठिकाणी करण्यात आलेल्या पक्षी गणनेत केवळ दहा हजारांच्या जवळपास पक्षी आढळले आहेत. एरवी हे पक्षी लाखोंच्या संख्येने असतात.
– डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कमी थंडी व पाणथळ जागेवरील गाळपेरा पाहता जायकवाडी धरणावर मोठ्या संख्येने आढळणारा फ्लेमिंगो दिसणे यंदा दुर्मिळ झाले आहे.
– यंदा पक्ष्यांचे प्रमुख काद्य असलेले छोटे शिंपले, शेवाळे दिसून येत नसल्याने स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या कमालीची घटली आहे.
– विशेष म्हणजे जायकवाडी धरणावर दरवर्षी 225 विविध जातींचे पक्षी आढळतात. यंदा मात्र फक्त 60 जातींचे पक्षीच आढळून आले आहेत.
मराठवाडा आणि महाराष्ट्रातील पक्ष्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करणारे पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक हे दरवर्षी जायकवाडी आणि परिसरातील पक्षी गणनेत सहभागी असतात. यावर्षीदेखेली तीन पथकांनी जायकवाडी परिसरातील 12 ठिकाणी ही गणना करण्यात आली. डॉ. किशोर पाठक म्हणाले, जायकवाडी धरणावर दरवर्षी डिसेंबरदरम्यान फ्लेमिंगोसह युरोप, लडाख, तिबेट, सैबेरिया, कच्छ, दक्षिण रशिया आदी देशांतून स्थलांतरीत पक्षी येतात. थंडीच्या काळात मार्च अखेरपर्यंत त्यांचा मुक्काम असतो. यंदा मात्र डिसेंबरमध्येच पक्षी कमी झाल्याचे समोर आले आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्यात अनेक कंपन्या रासायनिक द्रव्य टाकत असल्याने पक्ष्यांचे खाद्य असलेले छोटे शिंपले, शेवाळ कमी झाले आहे. तसेच थंडीही काही प्रमाणात कमी झाल्याने या पक्ष्यांची संख्या अचानक घटल्याचे डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारी, फेब्रुवारीदरम्यान जायकवाडी आणि परिसरात पक्षी निरीक्षणासाठी जाणाऱ्या निसर्गप्रेमींची यंदा मात्र निराशा होत आहे.
इतर बातम्या-