नवी दिल्ली : एमआयएमला महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) येण्यापासून फटकारणाऱ्या शिवसेनेवर भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आज चांगलंच तोंडसुख घेतलं. तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नीतीवरही त्यांनी जळजळीत टीका केली. काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला दलितांची मतं लागतात पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. मुस्लिमांची मतं लागतात, पण एमआयएम (MIM) पक्ष चालत नाही, ही यांची नीती आहे, असं म्हणत दानवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्यासाठी काँग्रेसनेच कसा उमेदवार उभा केला, याचा दाखला दिला. तसेच शिवसेनेमध्ये आता दाखवण्यासाठीही हिंदुत्व राहिलं नाही, त्यामुळे ते वारंवार आम्ही हिंदुत्ववादी आहोत, असा उल्लेख करत सुटलेत, अशी खोचक टीकाही दानवे यांनी केली.
एमआयएमने महालिकास आघाडीत शामिल होण्याचा प्रस्ताव दिला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राळ उठली आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यात उभे राहिले होते. काँग्रेसने उमेदवार उभा केला. पंडित जवाहरलाल नेहरू प्रचाराला आले. बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेब दादारमध्ये लोकसभेला उभे राहिले. त्या ठिकाणीही काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला. बाबासाहेबांचा पराभव केला. एका बाजूला दलितांचे मत लागतात, पण दलितांचा नेता लागत नाही. तसं एमआयएमचे मुसलमान मतं लागतात, पण पक्ष लागत नाही. ही यांची नीती आहे, आता सर्वांनी ओळखून घेतलं आहे, अशी जोरदार टीका रावसाहेब दानवे यांनी केली.
शिवसेनेने विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंवाद मोहीमेला प्रारंभ केला आहे. यामुळे विदर्भात भाजपाला सुरुंग लागणार अशी चर्चा आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘ भाजपला सेंध देण्याची क्षमता शिवसेनेत राहिली नाही. आपला घसरता जनाधार सांभाळण्यासाठी भाजपला सुरुंग लावण्यासाठी आम्ही जात आहोत, असे ते सांगतायत. पण त्यांच्या कार्यकर्त्यांची हिंमत वाढवण्यासाठी चाललेला प्रकार आहे. परंतु शिवसेनेचं हिंदुत्व ते फिकं पडलं आहे. वारंवार ते हिंदुत्वाचा उल्लेख करतायत, पण आता त्यांच्याकडे तसं काही राहिलेलं नाही. तुम्ही हिंदुत्वाचे आहात तर जेलमध्ये असलेल्या नवाब मलिकांना पाठींबा देतात. फिक्या पडलेल्या शिवसेनेला रंग देण्याचा शिवसेनेचा प्रकार आहे. पण भाजपवर याचा काहीही परिणाम होणार नाही. मराठवाडा, विदर्भासह मुंबईतदेखील भाजप जोरदार मुसंडी मारणार, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.
MIM ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप केला जातो. यावर बोलताना भाजप नेते दानवे म्हणाले, ‘ आमचा नंबर एकचा शत्रू काँग्रेस, दोन नंबरचा शत्रू एमआयएम आहे. आणि तिसरा शत्रू कम्युनिस्ट आहेत. त्यामुळे एमआयएम ही आमची बी काय झेड टीमही असू शकत नाही. जनतेचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रवादीनं टाकलेली ही गुगली आहे. राष्ट्रवादी गेला बाजूला, काँग्रेस गेला बाजूला, शिवसेनाच आतून एमआयएमशी हातमिळवणी करतंय की काय, अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण शिवसेनेनं आतापर्यंत जे जाहीरपणे म्हणलं नाही, तेच केलं आहे, असं वक्तव्य दानवे यांनी केलं.
इतर बातम्या-