औरंगाबादः शहरातील शासकीय दंत महाविद्यालयात () गेल्या पाच महिन्यांत तब्बल 15 हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. कोरोनानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली आहे. औरंगाबादमधील या रुग्णालयात कोरोनानंतर दात दुखणे, दात हलणे, हिरड्यांवर सूज येणे यासारखे अनेक आजार रुग्णांमध्ये दिसून येत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांमध्येही दातांसंबधी आजार वाढल्याचे दिसत आहे. सध्या दंत महाविद्यालयात रुग्णांना उपचारासाठी किमान एक महिन्याची वेटिंग देण्यात येत आहे.
कोरोनाकाळात दंतोपचार बंद होते. सध्या कोरोना चाचणी केल्यानंतरच दाताच्या सर्जरी करण्यात येत आहेत. नेहमीच्या तुलनेत साधारणत: 25 टक्के रुग्णांची वाढ झाली आहे. मे महिन्यात 819, जुनमध्ये 17566, जुलैै-2350, ऑगस्ट- 2462, सप्टेंबर-2559 तर ऑक्टोबरच्या पंधरा दिवसांत 1508 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. 3487 जुन्या पेशंटवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयाच्या विविध विभागंत दररोज किमान 50 सर्जरी केल्या जात आहेत. सर्जरी आधी कोरोना चाचणी केली जाते. आतापर्यंत चार हजार जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये चार रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती, अधिष्ठाता एस.पी. डांगे यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांमधील दातांच्या समस्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दंत शल्यचिकित्सक अविनाश कोळपकर यांनी सांगितले, लहान मुलांमध्ये दात किडण्याच्या आजारात वाढ झाली आहे. यासाठी सिमेंट टाकणे, रुट कॅनॉल, चांदी भरणे या उपचार पद्धती केल्या जातात. सध्या दररोज चाळीस ते पन्नास मुलांवर ओपीडीत उपचार केले जातात. विभाग प्रमुख डॉ. सीमा पाठक यांनी सांगितले, सकाळपासूनच रुग्णांची रांग लागलेली असते. बालरोग विभागात येणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. मुलांनी दाताला कीड लागल्यावर तत्काळ उपचार करून घ्यावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
दातांच्या इतर खासगी रुग्णालयांमध्ये साध्या साध्या उपचारांसाठी भरमसाठ शुल्क आकारले जाते. मात्र शासकीय दंत रुग्णालयात हे उपचार अत्यंत स्वस्त दरात करून मिळतात. शासकीय रुग्णालयात करण्यात येणारी उपचारपद्धती आणि कमी खर्चामुळे सामान्य लोकांचा ओढा आधिक आहे. त्यामध्ये दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती डॉ.एस.पी. डांगे यांनी दिली.
इतर बातम्या-