औरंगाबादः ‘रंग दे बसंती’ (Rang De Basanti) चित्रपटाचे कथानक दिग्दर्शक राकेश मेहरा यांनी आपल्या स्क्रिप्टवरून चोरल्याचा आरोप औरंगाबादमधील एका व्यक्तीने केला होता. 2008 मध्ये या व्यक्तीने प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे राकेश मेहरांविरोधात याचिकाही दाखल केली होती. नुकताच कोर्टाने या प्रकरणी निकाल दिला असून संबंधित व्यक्तीची याचिका कोर्टाने फेटाळली. तसेच दिग्दर्शक राकेश मेहरा यांना दोषमुक्त ठरवले आहे. या प्रकरणी मेहरा (Rakesh Mehra) यांच्या वतीने अॅड. दीपक मनोरकर यांनी काम पाहिले.
या प्रकरणी औरंगाबाद शहरातील मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांनी याचिका दाखल केली होती. हुसेन यांनी आपण इंडियन फिल्म रायटर्स असोसिएशनचे सदस्य असून ‘इन्कलाब’ नावाच्या चित्रपटाची कथा लिहिली होती. तसेच ती असोसिएशनकडे रजिस्टर्ड केल्याचा दावाही केला होता. 1999 साली आपण दिग्दर्शक राकेश मेहरा यांना ही कथा ऐकवली होती. या कथेवर 2006 मध्ये मेहरा यांनी ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट तयार केला, असा आरोप हुसेन यांनी केला. 2008 मध्ये हुसेन यांनी मेहरा यांच्याविरोधात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मेहरा यांच्या वतीने अॅड. दीपक मनोरकर यांनी कोर्टात बाजू मांडली.
या प्रकरणी अॅड. मनोरकर यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, हुसेन यांनी काही दिग्दर्शकांवर चुकीचे आरोप केलेले असून कोर्टाने या सर्वांना दोषमुक्त केल्याचे निदर्शनास आणून दिले. कोर्टाने हा युक्तीवाद मान्य करीत राकेश मेहरा यांना दोषमुक्त ठरवत हुसेन यांची याचिका निकालात काढली.
इतर बातम्या-