संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 29 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या पाच दिवसात त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना बोलताना धाप लागते. आवाज क्षीण झालाय. हात थरथरतात. बोलताना डोळे बंद होतात. चेहरा पूर्णपणे सुकून गेलाय. अन्न आणि पाण्याला पाच दिवस हात लावला नाही, त्यामुळे पोटदुखीचा त्रास वाढलाय. तशाही अवस्थेत जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. आज मीडियाशी संवाद साधताना त्यांनी एक वाक्य म्हटलं अन् अनेकांच्या काळजात चर्रर झालं. मी कुटुंबाचा उरलो नाही. माझ्यासमोर माझं कुटुंब आणू नका. मला भावनिक नात्यात गुंतवू नका. उद्या तुमचं हे पोरगं गेलं तर बिनधास्त कुंकू पुसायचं. रडायचं नाही, असं उद्गार मनोज जरांगे पाटील यांनी काढलं अन् अनेकांच्या मनात कालवाकालव झाली.
लढाई लढताना मराठ्याने म्हणजे क्षत्रियाने रडायचं नसतं. घाबरायचं नसतं. उद्या या अटीतटीच्या लढाईत तुमचं पोरगं गेलं तर बिनधास्त कुंकू पुसायचं. रडायचं नाही. तो क्षत्रियांचा धर्म आहे. लढताना मरण आलं तर मागे सरायचं नाही. लढतच राहायचं. त्यामुळेच मी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. फक्त तुम्ही शांततेत आंदोलन करा. मी आता हटत नाही. काही झालं तरी हटत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आता फक्त दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे सरकारने आरक्षण द्यावं, नाही तर मराठ्यांशी शांततेत सामना करावा. दुसरा पर्यायच राहिला नाही. आता हळूहळू देशातील क्षत्रिय मराठा उठणार आहे. हे थोड्या दिवसात कळेल. थोडं थांबा, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
प्रत्येकाचं कुटुंबावर प्रेम असतं. माझंही माझ्या कुटुंबावर अतोनात प्रेम आहे. पण आंदोलनात मी फक्त आणि फक्त समाजाचा आहे. कुटुंबाचा नाही. यापुढे माझं कुटुंब माझ्यासमोर आणू नका. प्रत्येकाला लेकरं आईबाप पाहिल्यावर माया येते. त्यामुळे त्याच्या शरीरावर परिणाम होत असतो. त्याचा हुंदका भरून येत असतो. त्यामुळे दोन दिवस अधिकचं उपोषण होत नाही. म्हणून मी खवळतो. तुमच्यावर खवळायला मी मूर्ख नाही, असं ते म्हणाले.
कुणाचंही कुटुंब, कुणालाही समोर दिसलं तर हुंदका भरून येत असतो आणि माणूस दोन पावलं मागे येत असतो. याचा विचार करा. माझंही माझ्या कुटुंबावर प्रेम आहे. माझ्या समाजावरही आहे. पण मी एकदा आंदोलनाला बसलो तर कुटुंबाला मानत नाही. मी समाजाला मानतो. मी आधी समाजाचं लेकरू आणि नंतर मी माझ्या कुटुंबाचा. आधी समाजाचा नाही. माझं कुटुंब कधीही येत नसतं. आता कुटुंब यायला लागलं. कुटुंबाने येऊ नये. मी पहिला समाजाचा आहे. जगलो तर तुमचा. मेलो तर समाजाचा. कुटुंबाने यायचं नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हणताच सर्वांच्या काळजात चर्रर झालं. प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
मला बोलता येतं तोपर्यंत या, आमच्याशी चर्चा करा. तुम्हाला अडवलं जाणार नाही. तुमचं स्वागत करू. तुम्हाला संरक्षण देऊ. पण आज किंवा उद्याच या. त्यानंतर येऊन फायदा नाही. माझी बोलती बंद झाली तर कशाला येता? असा सवाल करतानाच रट्टा खायला येता का? आज उद्या यायचं तर या नाही तर झोपा तिकडे. चर्चेला येऊ देत नाही म्हणतात. म्हणून म्हणतो या. आमचं आता रात्रीपासून सुरू झालं आहे. आता तुम्ही बघायचं. खायचं, झोपायचं आणि घरातच हागायचं, असंही ते म्हणाले.