औरंगाबाद: पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) दसरा प्रत्येक वेळेस कुठल्या तरी एका कारणामुळे चर्चेत असतो. अर्थातच हे कारण राजकीय जास्त असतं. त्यामुळे चर्चा तर होणारच. आजचा दसरा काय खास असेल याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहेच. त्यातही केंद्रीय मंत्री झालेले आणि कधी काळी दसऱ्याचं स्टेज सांभाळणारे भागवत कराड हजेरी लावणार की नाही याची चर्चा सुरु होती. त्यातच काही दिवसांपूर्वी, आता मी केंद्रीय मंत्री झालोय, त्यामुळे बघावं लागेल असं म्हणून कराडांनी कहानीत ट्विस्ट आणलेला होता. पंकजा मुंडेंसोबतच्या त्यांच्या मतभेद-नाराजीच्या पार्श्वभूमीवर कराडांच्या वक्तव्यानं जास्तच उत्सुकता निर्माण केली. पण शेवटी भागवत कराड हे सावरगावच्या भगवान भक्तीगडावर येणार असल्याचं स्पष्ट झालंय. ते औरंगाबादहून परळीला येतील. गोपीनाथगडावरून ते हेलिकॉप्टरनं पंकजांसोबत सावरगावच्या दसरा मेळाव्याला पोहोचत आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळाव्याची प्रथा सुरु केली. तेव्हा भागवत कराड हे सामान्य कार्यकर्ता होते. तेव्हा संपूर्ण दसरा मेळाव्याचे नियोजन, स्टेजची तयारी, कार्यकर्त्यांचे नियोजन ही सर्व व्यवस्था भागवत कराड यांनी सांभाळली होती. आता मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवल्यावर डॉ. कराड हे स्वतः दसरा मेळाव्याच्या व्यासपीठाची शोभा वाढवणार आहेत. पंकजा मुंडेंप्रमाणेच डॉ. भागवत कराडदेखील या भाषणात काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोदी सरकारने केलेल्या नव्या विस्तरात मराठवाड्यातून डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. कराड यांना केंद्रात अर्थराज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा नाराज होत्या. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कराड यांना त्यांनी शुभेच्छाही दिली नव्हती. त्यानंतर वरळी येथील निवासस्थानी झालेल्या सभेत त्यांनी भाजप नेत्यांवर नाव न घेता टीकाही केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी कराड यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिली होती. या घटनेनंतर दोन ते तीन वेळा कराड आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्याने त्यांच्यात दिलजमाई झाल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे कराड या मेळाव्याला उपस्थित राहणार का? पंकजा मुंडे त्यांना निमंत्रण देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील 12 एकर परिसरात होणार आहे. मेळाव्याआधी गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत भगवान बाबांच्या भव्य मूर्तीच्या खाली असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते, तेही बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पाणी साचणारच नाही अशी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर वॉटर प्रुफ करण्यात येत आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्यातून तसेच बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार आहे.
इतर बातम्या-