औरंगाबाद: राज्यभरात गाजत असलेल्या औरंगाबादमधील डॉ. राजन शिंदे (Aurangabad Dr. Shinde Murder Case) यांच्या क्रूर हत्येचा उलगडा सहा दिवसानंतरही झालेला नाही. सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी पहाटेच शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयातील डॉ. शिंदे यांचा अत्यंत क्रूरपणे खून झाला. या खूनाचा उलगडा करण्यासाठी शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. हा खून कोणी केला, याचा तपास करण्यासाठी शिंदे यांचे निकटवर्तीय, कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी, महाविद्यालयातील अधिकारी आदी सर्वांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र सहा दिवस उलटूनही पोलिसांच्या (Aurangabad police)हाती ठोस पुरावा सापडलेला नाही. दरम्यान, पोलिसांना शिंदे यांच्या निकटवर्तीयांवरच दाट संशय आहे. त्यापैकी एकाने खून केल्याची कबूली दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे, असे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच आरोपीने खून करून ते शस्त्र घराजवळीलच विहिरीत टाकल्याचे सांगितले. त्यावरून विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याचे काम शनिवारी 16 ऑक्टोबर रोजी दिवसभर सुरु होते.
डॉ. शिंदे यांच्या निकटवर्तीयाने, तो हिटलरसारखे वागत होता, त्यामुळे एकदाचे त्याला संपविले, अशी कबूली दिली. परंतु फक्त या कारणामुळे डॉ. शिंदे यांचा एवढा निर्घृण खून कसा केला, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे पोलीसही या जबाबावर समाधानी नाहीत.
डॉ. शिंदेंच्या खुनातील संशयिताने खूनाची कबूली दिल्यानंतर डॉ. शिंदे यांच्या घराजवळील विहिरीतील पाणी उपसण्याचे काम दुपारी 3 वाजता हाती घेण्यात आले. महापालिकेच्या मदतीने पाच एचपीने दोन व दोन एचपीचे दोन अशा चार पंपांद्वारे पाणी उपसले जात आहे. दुपारनंतर या कामाने वेग घेतल्याची माहिती महापालिकेचे उपअभियंता राजू संधा यांनी दिली. ही विहिर अनेक वर्षांपासून पडीक असल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर कचरा आहे. त्यामुळे त्यात गॅसही असण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री 11 वाजेपर्यंत 35 फुटांपैकी 25 फूट पाणी उपसण्यात आले होते. सर्व पाणी रविवारी पहाटे 3 वाजेपर्यंत उपसले जाणार होते.
अनेक गंभीर गुन्ह्यांत सबळ पुरावा मिळाला नाही तर परिस्थितीजन्य पुराव्याआधारे संशयितांना ताब्यात घेतले जाते. नंतर संशयितांना पोलिसी खाक्या दाखवून कबुलीजबाब वदवून घेतला जातो. प्रा. शिंदे प्रकरणात ही पद्धत वापरली गेली नाही. यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव म्हणाले, ‘गुन्हा उघडकीस आणण्यात काही अडचणी होत्या. पण आता आम्ही आरोपींच्या मुसक्या लवकरच आवळणार आहोत. कुणालाही पाठीशी घालणार नाही. फक्त रविवारपर्यंत वाट पाहा.’, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी डॉ. शिंदे यांचा मुलगा रोहित पोलिसांना संबंधित विहिरीत पुरावे टाकल्याचे म्हटला होता. मात्र शुक्रवारनंतर या विहिरीतील पाणी उपसण्याचे काम पोलिसांनी सुरु केले. पण या कामासाठी सहा दिवसांचा वेळ पोलिसांनी का घेतला, हे अजूनही गुपितच आहे. तसेच डॉ. शिंदे यांच्या पत्नी प्रा. मनीषा शिंदे यांच्या जबाबात मृतदेह सकाळी सात वाजता पाहिल्याचे म्हटले. प्रत्यक्षात उस्मानाबाद उपकेंद्रातील सहाय्यक प्राध्यापकाला पहाटे पाच वाजताच फोन करून त्यांनी पतीचा खून झाल्याचे सांगितले. या तफावतीकडे पोलीस दुर्लक्ष का करत आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे. वडील रक्ताच्या थारोळ्यात असताना अल्पवयीन म्हटला जाणारा मुलगा रोहित व मुलगी चैताली पहाटे रुग्णवाहिका आणण्यासाठी गेले, यावर पोलिसांचा विश्वास कसा बसला, असाही एक प्रश्न आहे.
इतर बातम्या-
बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार, यवतमाळमध्ये कुख्यात गुंडाची पीडितेला बेदम मारहाण
ज्वेलरच्या दुकानातून 20 तोळे सोन्यासह कामगार पसार, कोलकात्यातून दोघांना अटक