औरंगाबादः शहरात 11 नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) कारवाईचे सत्र सुरु आहे. गुरुवारी औरंगाबाद (Aurangabad city) शहरात 54 अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरातील पद्माकर मुळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज (Padmakar Mule) आणि बिल्डर जुगलकिशोर तापडिया (Jugalkishor Tapdia) यांचे निवासस्थान आणि कार्यालय अशा एकूण सात ठिकाणी छापे मारले. रात्री उशीरापर्यंत या ठिकाणांवरील सामान आणि कागदपत्रांची झाडाझडती सुरु होती. दरम्यान, गुरुवारी रात्रीच ईडीची पथके कागदपत्र आणि पुराव्यांसह मुंबईत रवाना झाली तर एक पथक अजूनही शहरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहरातील पद्मकार मुळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि बिल्डर जुगलकिशोर तापडिया यांच्याविरोधात ईडीने गुरुवारी धाडसत्र उघडले. तापडिया यांच्या निराला बाजार येथील बंगल्यावर ईडीने धाड टाकली. तेथे एक महिला अधिकारी व पाच पुरुष अधिकार्यांच्या पथकाने तपासणी केली. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. बंगल्यातील प्रत्येक खोलीत जाऊन त्यांनी झडती घेतली. काही महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तसेच 12 जणांचे पथक मनमंदिर ट्रॅव्हल्स कार्यलयाच्या मागील कार्यालयात धडकले. त्यांनी पहिल्या मजल्यावरील तापडिया यांच्या कार्यालयात छापा मारून कागदपत्रे हस्तगत केली. नंतर त्याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील पद्माकर मुळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यालयात गेले. रात्री उशिरापर्यंत पथक तेथे झाडाझडती घेत होते. उद्योजकांचा मुलगा आणि ऑफिसचा स्टाफ यावेळी तेथे हजर होता.
शहरात ईडीच्या कारवाईचा बडगा सुरु होताच तापडिया यांच्या मुलाच्या दशमेशनगर येथील महागड्या गाड्यांच्या दालनात मोठी हालचाल सुरु झाली. लाखो रुपयांच्या दुचाकी इतरत्र हलवण्यात आल्या. त्यांच्याकडे असलेल्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या चारचाकी चौकशी सुरु असलेल्या कार्यालयाखाली उभ्या करण्यात आल्या. ती वाहने काही काळासाठी पथकाने ताब्यात घेतल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, ज्या कारची चौकशी सुरु होती, ती काही दिवसांपूर्वी दिवाळीत खरेदी करण्यात आले असून शहरात एवढी महागडी एकमेव गाडी असल्याचे बोलले जात आहे. या कारच्या बाजूला उभे राहून अनेकांनी दिवसभरात फोटोही काढून घेतले.
औरंगाबादमध्ये कारवाई करण्यात आलेल्या या दोन्ही उद्योजकांची कार्यलये एकाच इमारतीत असल्याने बघ्यांचीदेखील मोठी गर्दी झाली होती. अदालत रोडवर हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती परिसरात आहे. यापैकी एक उद्योजक दिवसभर कार्यालयात बसून होते. या कार्यालयांमध्ये ईडीची काही पथके होती. तर उद्योजकांच्या इतर संपत्तीची चौकशी करण्यासाठी शहरात इतर ठिकाणी काही पथके फिरत होती. या सर्व कारवाईदरम्यान कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठा ताण दिसून येत होता.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी जालन्यातील एक कंत्राटदाराचे कार्यालय आणि निवासस्थानावर धाड टाकली. या कंत्राटदाराचे एका राजकीय नेत्याशी जवळकीचे संबंध आहेत. तसेच उदगीर तालुक्यातील तोंडावर येथील प्रियदर्शनी साखर कारखाना तसेच अहमदपूर तालुक्यातील पूर्वीचा बालाघाट व आताचा सिद्धी शुगर्स साखर कारखाना येथेही पथक दाखल झाल्याची माहिती हाती आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माजी खासदार कै. बाळासाहेब पवार यांनी रामनगर येथील माळरानावर जालना सहकारी साखर कारखाना उभारला होता. बाळासाहेब पवार यांच्यानंतर हा कारखाना कर्जबाजारी झाला. राज्य सहकारी बँकेने हा कारखाना सरफेसी कायद्याअंतर्गत तापडिया कंस्ट्रक्शन या कंपनीला विकला. त्यांनी साखर कारखाना चालू न करता 2016 मध्ये अर्जून शुगर इंडस्ट्रीला विकला. यात उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा समावेश आहे. यात मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाला, अशी तक्रार ईडीला प्राप्त झाली. त्यावरून ही छापेमारी झाल्याचे सूत्रांकडून कळाले आहे.
गेल्या महिन्यात भाजपचे नेते किरीट सोमय्या हे लातूर दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यात मोठा घोटाळा झाला आहे. असे सांगत या प्रकरणाच्या चौकशीसाठी आपण ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटणार असून दिवाळीनंतर ही चौकशी सुरु होईल, असे सांगितले होते. विशेष म्हणजे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार रमेशअप्पा कराड, आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्ह्यातील साखर कारखाने तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियमबाह्य देण्यात आलेल्या कर्जाबाबतची कागदपत्रे सोमय्या यांना दिली होती.
इतर बातम्या-