VIDEO: ईडीची पुढची कारवाई अशोक चव्हाणांवर?; चंद्रकांतदादा म्हणतात, माझ्या हसण्यातून काय तो अर्थ काढा

| Updated on: Oct 19, 2021 | 4:06 PM

महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या मागे ईडीचं शुक्लकाष्ठ लागलं असतानाच आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यामागेही ईडीची चौकशी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (ED's next target Congress leader Ashok Chavan?)

VIDEO: ईडीची पुढची कारवाई अशोक चव्हाणांवर?; चंद्रकांतदादा म्हणतात, माझ्या हसण्यातून काय तो अर्थ काढा
chandrakant patil
Follow us on

नांदेड: महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या मागे ईडीचं शुक्लकाष्ठ लागलं असतानाच आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यामागेही ईडीची चौकशी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नांदेडमधील बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला असता चंद्रकांतदादांनी आधी स्मित हास्य केलं. त्यानंतर माझ्या हसण्यातून काय अर्थ काढायाचा तो काढा असं सांगून एकच खळबळ उडवून दिली. त्यामुळे ईडीचं पुढचं लक्ष्य अशोक चव्हाण आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. हा संवाद साधत असतानाच नांदेडमधील बड्या नेत्यांवर ईडीची किंवा आयकरची कारवाई होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. हा सवाल येताच चंद्रकांतदादा आधी हसले. त्यानंतर त्यांनी पॉझ घेतला आणि आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. मी काही तपास यंत्रणांचा अधिकारी नाही. त्यामुळे मला माहीत नाही. पण माझ्या हसण्यावरून काही कळलं तर ते कॅरी करायला हरकत नाही, असं सूचक विधान चंद्रकांतदादांनी केलं. चंद्रकांतदादांनी हे विधान करताना कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांचा संपूर्ण रोख अशोक चव्हाणांकडे असल्याने चव्हाणांची चौकशी होणार का? या चर्चेने जोर धरला आहे.

दोन व्यापाऱ्यांवर धाडी

काही महिन्यांपूर्वीच अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित दोन व्यापाऱ्यांवर ईडी आणि आयटीच्या रेड पडल्या होत्या. त्यामुळे चंद्रकांतदादांच्या या विधानाने चव्हाणांच्या गळ्याचा फास आवळला जातोय का? असा सवाल केला जात आहे.

देगलूर पोटनिवडणुकीत तिरंगी लढत

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, तर वंचित आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले यांच्यासह 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी सहा उमेदवार अपक्ष आहेत.

देगलूर – बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवस अखेर एकूण 23 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होते. त्यातील छाननीअंती 2 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे एकूण 21 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. 13 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

कोणकोणते उमेदवार रिंगणात

जितेश रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस),
सुभाष पिराजीराव साबणे (भाजप)
उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी)
विवेक पुंडलिकराव केररकर (जनता दल (सेक्युलर))
प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी)
डी डी वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे))
अरुण कोंडीबाराव दापकेकर (अपक्ष)
साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष),
भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष),
मारुती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष),
विमल बाबुराव वाघमारे (अपक्ष),
कॉ.प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष)

संबंधित बातम्या:

सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

राजकारणातल्या दोन सख्ख्या मित्रांची कहाणी, दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात गडकरींचं नाव, मित्रत्व असावं तर असं!

आता सर्वच मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आलीय; राऊतांपाठोपाठ भास्कर जाधवही आक्रमक

(ED’s next target Congress leader Ashok Chavan?)