औरंगाबादः कृषीपंपांच्या वीज बिलातील थकबाकीत सुमारे 66 टक्के सूट मिळवण्याच्या संधीचा लाभ औरंगाबाद परिमंडलातील 45 हजार 768 शेतकऱ्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. गेल्या दीड महिन्यात एवढ्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत वीजबिल भरल्याने महावितरणतर्फे (MSEDCL) वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई टाळली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे 32 हजार 62 शेतकऱ्यांनी 1 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या काळात 17 कोटी 55 लाख रुपये थकबाकीपोटी महावितरणकडे जमा केले. तर जालना जिल्ह्यातील १३ हजार ७०६ शेतकऱ्यांनी ७ कोटी १९ लाख रुपये वीजबिल भरून महाकृषी ऊर्जा अभियानात सहभाग घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २५२ व जालना जिल्ह्यातील ८७२ शेतकरी चालू वीजबिले भरून पूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. या योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे.
सरकारच्या या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त झालेल्या गांधेली येथील कौतिकराव नाथाजी नरवडे, भालगाव येथील आश्रू पुंजाजी डिघुळे या शेतकऱ्यांचा औरंगाबाद ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला. तसेच इतरही शेतकऱ्यांनी 66 टक्के सवलतीचा लाभ घेत थकबाकी मुक्त होत वीजपुरवठा सुरळीत करून घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले.
इतर बातम्या-