औरंगाबादः वाळूज ते चिकलठाणा हा तब्बल 20 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल (Aurangabad fliover) उभारण्याचे वक्तव्य पुन्हा एकदा नितीन गडकरी यांनी लातूरमध्ये केलं. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) रस्ते विकासाच्या कामांच्या शुभारंभ कार्यक्रमात भाषण करत होते, त्यावेळी त्यांनी औरंगाबादमधील बहुचर्चित उड्डाणपूलाचा आवर्जून उल्लेख केला. केंद्रीय दळणवळण खात्याकडे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (NHAI) स्थानिक प्रकल्प कार्याललयातून या पुलासाठीचा प्रस्ताव ऑक्टोबर 2021 मध्ये पाठवण्यात आला आहे. तसेच या पुलासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा डीपीआर तयार केला जाणार असल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये चिकलठाणा ते वाळूज या उड्डाणपूलाची चर्चा आहे. हा पूल झाला तर वाळूज ते डीएमआयसी परिसरातील सर्व उद्योग वसाहती परस्परांशी जोडल्या जातील. दळणवळणाचा मोठा ताण कमी होईल. नाशिक, नागपूरमध्ये अशा पुलांची उभारणी झाली आहे. त्याच धर्तीवर औरंगाबादमध्ये पूल उभारल्यास औद्योगिक नगरी औरंगाबादचे रूप पूर्णतः पालटेल.
20 किलोमीटर लांबीचा पूल उभारणीसाठीचा डीपीआर मंजुरीनंतर पुलासाठी किती जागा लागेल, याची पाहणी होईल. किती मालमत्ता बाधित होतील, याचा सर्वेक्षण अहवाल तयार केला जाईल. या सर्व तांत्रिक बाबींचा नव्याने अहवाल तयार करून तो पुन्हा एकदा मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे जाईल.
औरंगाबादच्या मध्यवर्ती असलेल्या जालना रोडवर 20 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाचे स्वप्न दाखवले जात आहे. मात्र यातही अनेक अडचणी आहेत. याआधीच जालना रोडवर अनेक पूल आहेत. त्यात छावणी, महावीर चौक, क्रांती चौक, मोंढा नाका, सेव्हन हिल्स, सिडको आदी उड्डाण पुलांचा समावेश आहे. या पुलांवर जवळपास 200 कोटींच्या आसपास खर्च झाला आहे. नव्याने उड्डाणपूल बांधल्यास एवढा खर्च पाण्यात जाणार का, असा प्रश्न आहे. तसेच विमानतळासमोरदेखील एका उड्डाणपूलास मंजूरी मिळाली आहे. 20 किमीच्या एकाच पुलाची घोषणा केल्यामुळे त्या पुलाचे काय होणार, हाही प्रश्न आहे.
इतर बातम्या-