औरंगाबादः दिलेल्या पैशांची दुप्पट किंमत मिळणार असे अमिष दाखवून औरंगाबादमधील 12 नागरिकांची फसवणूक झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. शहरातील 12 नागरिकांनी दामदुपटीच्या अमिषांना बळी पडून अशा ठिकाणी पैसे पाठवले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे (Aurangabad cyber police) धाव घेतली. मात्र तक्रार दाखल होताच, पोलिसांची तपास चक्रे फिरू लागली आणि संबंधित नागरिकांचे पैसे पुन्हा पाठवण्यात आले.
तक्रारदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी फोन पे, गुगल पे आदी ऑनलाइन गेट वेच्या माध्यमांतून पेमेंट केले होते. औरंगाबादच्या पोलीस ठाण्यात 12 नागरिकांनी ऑनलाइन फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होत. निरीक्षक गौतम पातारे यांनी तक्रारींची तत्काळ दखल घेत तांत्रिक बाजू तपासली. ज्या गेट वे च्या माध्यमातून पेमेंट झाले होते, त्या व्यवस्थापनाला माहिती कळवून नागरिकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आणून दिले. यासाठी उपनिरीक्षक राहुल चव्हाण, हवालदार सुशांत शेळके आणि रवींद्र पौळ यांनी अधिक तपास केला. ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले होते, ती खाती गोठवण्याची मागणी केली होती.
गुगल पे, फोन पेसह इतर कंपन्यांनी पोलिसांच्या सूचनांनुसार या प्रकरणाचा तपास केला असता, संबंधित नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोरआले. त्यानंतर संबंधित तक्रारदारांनी पाठवलेले 5 लाख 64 हजार रुपये पुन्हा त्यांना रिफंड केल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी केली. ही कामगिरी आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पातारे, उपनिरीक्षक चव्हाण, हवालदार सुशांत शेळके, रवींद्र पौळ यांनी केली.
सध्या विविध कंपन्या परस्परांना ग्राहकांच्या डाटाची देवाण-घेवाण करत असतात. त्यामुळे अनेक ग्राहकांना क्रेडिट कार्डाचे पॉइंट्स वाढवतो, पैसे दाम दुप्पट करतो, असे अमिष दाखवणारे फोन सतत येत असतात. मात्र या संदेशाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्यात येते. अशा कोणत्याही अमिषांना नागरिकांनी बळू पडू नये, असे आवाहन सायबर पोलीसांनी केले आहे.
इतर बातम्या-