औरंगाबादः मुंबईच्या जेजे हॉस्पिटलच्या (J J Hospital, Mumbai) 4 हजार लोकांच्या जेवणाचे कंत्राट मिळवून देतो, असे अमिष दाखवत औरंगाबादमधील प्रसिद्ध नैवेद्य हॉटेल (Naivedya Hotel) मालकाला लाखो रुपयांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे कंत्राट मिळवून देण्यासाठी 70 ते 80 लाख रुपये अनामत द्यावे लागतील, असे हॉटेल मालकांना सांगण्यात आले. त्यानुसार नैवेद्य हॉटेलचे मालक भक्तबंधू रामचंद्र पाढी यांना 41 लाख 5 हजार रुपयांना फसवण्यात आले. या प्रकरणी आता एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात (CIDCO police station) तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकजण औरंगाबाद, दुसरा मुंबई तर तिसरा नाशिक येथील रहिवासी आहे.
एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रजनी रानमारे (प्रतापनगर, औरंगाबाद), संदीप बाबुलाल वाघ (मुलुंड, मुंबई) आणि स्वप्नील भरत नांद्रे (नाशिक) या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात आरोपींनी पाढी यांना विश्वासात घेून आमची आर.बी. केटरर्स व फूड सप्लायर्स या नावाने 12 स्वरुप निकेतन, बामणवाडा, अंधेरी प. येथे फूड सप्लायची फर्म असल्याचे सांगितले. याद्वारे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मोठमोठी सरकारी कार्यालये, हॉस्पिटलच्या कँटीनला अन्नपुरवठा करण्याचे टेंडर घेऊन त्यांना जेवण पुरवण्याचे काम करतो, असे सांगितले. तुम्हाला मुंबईतील जे जे हॉस्पिटल येथे 4 हजार लोकांना जेवण पुरवण्याचे काम करायचे का, असे विचारले. मात्र त्यासाठी डिपॉझिट भरण्याची अट घातली.
पाढी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी 2021 पासून आतापर्यंत केवळ डिपॉझिटच्या नावाखाली या लोकांना 41 लाख 5 हजार रुपये उकळले. मात्र त्या बदल्यात कोणतेही टेंडर मिळाले नाही. पैसे परत मागितल्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. तसेच पाढी यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. अखेर या सर्व प्रकाराविरोधात पाढी यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरुन पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.
इतर बातम्या-