औरंगाबादच्या गरजू तरुणांसाठी विनामूल्य व्यावसायिक प्रशिक्षण, स्मार्टसिटीचा लाइट हाऊस प्रकल्प, रोजगाराचे द्वारे खुले होणार

| Updated on: Sep 21, 2021 | 5:18 PM

औरंगाबाद: लाइटहाऊस कम्युनिटी पुणे (Lighthouse community, Pune) आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या (Aurangabad Smart city Project) संयुक्त विद्यमाने औरंगाबादमधील आंबेडकर नगरात गरजवंत तरुणांसाठी रोजगाराभिमुख प्रकल्प राबवला जात आहे. परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या किंवा दहावी-बारावीपर्यंत शिकलेल्या विद्यार्थ्यांमधील कौशल्ये ओळखून त्यांना भविष्यात एखादा कौशल्य विकासाचा (Skill Development Course) अभ्यासक्रम विनामूल्य पद्धतीने निवडून देण्यात या प्रकल्पाद्वारे मदत केली […]

औरंगाबादच्या गरजू तरुणांसाठी विनामूल्य व्यावसायिक प्रशिक्षण, स्मार्टसिटीचा लाइट हाऊस प्रकल्प, रोजगाराचे द्वारे खुले होणार
औरंगाबादमध्ये गरजू तरुणांसाठी विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षण प्रकल्पाला भरभरून प्रतिसाद.
Follow us on

औरंगाबाद: लाइटहाऊस कम्युनिटी पुणे (Lighthouse community, Pune) आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या (Aurangabad Smart city Project) संयुक्त विद्यमाने औरंगाबादमधील आंबेडकर नगरात गरजवंत तरुणांसाठी रोजगाराभिमुख प्रकल्प राबवला जात आहे. परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या किंवा दहावी-बारावीपर्यंत शिकलेल्या विद्यार्थ्यांमधील कौशल्ये ओळखून त्यांना भविष्यात एखादा कौशल्य विकासाचा (Skill Development Course) अभ्यासक्रम विनामूल्य पद्धतीने निवडून देण्यात या प्रकल्पाद्वारे मदत केली जाते. तसेच हा कोर्स पूर्ण झाल्यानंतरही संबंधित तरुणाला नोकरी मिळण्यासाठी पाठपुरावा या प्रकल्पामार्फत करण्यात येतो. त्यामुळे कोरोना काळात शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेल्या किंवा परिस्थितीपायी योग्य शिक्षण न घेतलेल्या तरुणांसाठी रोजगाराची ही उत्तम संधी असू शकते.

काय आहे लाइटहाऊस प्रकल्प?

लाईटहाउस हा कौशल्य विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून व्यावसायिक कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. हा प्रकल्प दोन टप्प्यात राबवला जात आहे.
याअंतर्गत दर महिन्याला 60 तरुणांना प्रवेश दिला जातो. पहिल्या टप्प्यात तरुणांना कोणत्या व्यावसायिक कोर्सची आवड आहे, याविषयी विचारपूस केली जाते. तसेच त्यानंतर त्यांना पर्सनल डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश कोर्स घेऊन त्यांच्यातील कौशल्याची ओळख करुन घेतली जाते. हा महिनाभराचा एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तरुणांना योग्य त्या कोर्ससाठी प्रवेश दिला जातो. याअंतर्गत नर्सिंग असिस्टिंट, ऑफिस अऍडमिनिस्ट्रेशन, इलेक्ट्रिशियन, टेलरिंग, ब्युटिपार्लर, आयटी, ऑफिस अऍडमिनिस्ट्रेशन आदी कोर्स तरुणांना उपलब्ध केले जातात. या कोर्सचे संपूर्ण शुल्क स्टरलाइट टेक्नोलॉजी कंपनीच्या सीएसआर निधीतून दिले जाणार आहे. सध्या सिडके एन 5 भागातील आंबेडकर नगर मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. 20 आणि 21 सप्टेंबर रोजी जयभीमनगर, 22 आणि 23 सप्टेंबर रामानगर, 24 सप्टेंबर मिसारवाडी या भागात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

आतापर्यंत किती तरुणांना फायदा?

स्मार्टसिटी मोहिमेअंतर्गत लाइटहाउस हा प्रकल्प मार्च महिन्यात सुरु झाला असून तरुणांना एवढे दिवस पर्सनल डेव्हलपमेंटचे धडे ऑनलाइन पद्धतीने देण्यात आले. अजून हा प्रकल्प शहरात पूर्ण क्षमतेने सुरु झाला नाही. तरीही आतापर्यंत याअंतर्गत 228 तरुणांनी प्रवेश घेतला असून 80 तरुणांनी विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर 13 तरुणांना नोकरीही मिळाली आहे, अशी माहिती लाइट हाऊस प्रकल्पाचे प्रमुख समीर शेख यांनी दिली. 21 सप्टेंबर रोजी आंबेडकर नगरात या मेगाआउटरीचचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे 200 तरुणांकडून प्रशिक्षण आणि नोकरीविषयी चौकशी केली. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका, स्मार्ट सिटी औरंगाबाद यांच्या बरोबरच महेंद्र सोनवणे यांनी सहकार्य केले.

पुणे, ठाणे, कल्याणच्या धर्तीवर औरंगाबादेत प्रकल्प

पुण्यातील लाइटहाऊस फाउंडेशन या संस्थेने औरंगाबादच्या आधी पुणे, ठाणे, कल्याण आदी शहरांमध्ये अशा प्रकारचे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प राबवला आहे. त्यातही संस्थेला मोठे यश मिळाले. त्यानुसारच औरंगाबादमध्ये हा लाइट हाऊस प्रकल्प राबवला जात आहे. त्यामुळे औरंगाबादच्या गरजू तरुणांसाठी ही रोजगार देणारी मोठी संधी ठरू शकते.

इतर बातम्या- 

आधी बेस्ट फ्रेंडची रिक्वेस्ट, मग अश्लील व्हिडिओ अन् चॅटिंग, अखेर औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात अडकला

लिचेडच्या पाण्याचे औरंगाबाद महापालिका करणार शुद्धीकरण, कचऱ्यापेक्षाही तिपटीने घातक लिचेड