औरंगाबादः दिवाळी जसजशी जवळ येतेय, तशी ग्राहकांची बाजारपेठेतील गर्दी वाढत आहे. सराफा बाजार (Aurangabad market) म्हणजे तर दिवाळीतील महत्त्वाची बाजारपेठ. दिवाळीला वाहन, रिअॅलिटी, इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारासोबतच सराफा बाजारातही मोठी उलाढाल होत असते. त्यामुळे येथील सोन्या-चांदीच्या (Gold-Silver price) भावांमधील चढ-उतारावर सर्वांचे लक्ष असते. सध्या दिवाळीची खरेदी ऐन रंगात असताना सोन्या-चांदीच्या भावात घसरणीचा ट्रेंड पहायला मिळतोय. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
आज 30 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणेच औरंगाबादच्या सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या भावात जवळपास 500 रुपयांची घसरण पहायला मिळाली. आज शनिवारी 22 कॅरेट सोन्याचे दर 47,600 रुपये प्रति तोळा एवढे तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,800 रुपये एवढे नोंदले गेले.
28 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सोन्याचे भाव 47,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,600 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले.
मंगळवारी औरंगाबादमधील 22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवण्यात आले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 68,800 रुपये एवढे नोंदले गेले.
25 ऑक्टोबर रोजी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 48,050 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. अर्थात शेअर बाजारातील चढ-उतारानुसार दर काही मिनिटांनी सोन्याच्या भावात चढ-उतार दिसत असतो. येथे दिलेले भाव हे त्या वेळेनुसार सरासरी काढून दिलेले आहेत.
सध्या औरंगाबादच्या सराफा बाजारात दिवाळीनिमित्त दागिने खरेदी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. यावेळी पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांसोबतच महिला वर्ग, विशेषतः तरुणींचा ओढा हिऱ्याच्या दागिन्यांकडेही जास्त असल्याचे दिसून येत आहे. प्लॅटिनमच्या दागिन्यांनाही महिला वर्ग पसंती देत आहे. बाजारात कलकत्ता, राजस्थानी, बंगाली अशा डिझाइन्सचे दागिने उपलब्ध आहेत. आकाराने मोठे, पण वजनाने हलके दागिने खरेदी करण्याकडे महिलांचा कल आहे. अंगठ्यांमध्येही खूप प्रकार आले आहेत. यात बंगाली वर्क, टेंपल वर्क, कलकत्ता वर्क तसेच अमेरिकन डायमंडच्या अंगठ्यांना मागणी आहे. एवढेच नव्हे तर कासव असलेली अंगठीही आवर्जून खरेदी केली जाते, अशी माहिती ज्वेलर्सनी दिली.
इतर बातम्या