औरंगाबाद: यंदा सलग तिसऱ्या वर्षी औरंगाबाद जिल्ह्यात दमदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. यावर्षी तर ऑगस्ट, सप्टेंबर (August-September) या दोन महिन्यांतच वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे औरंगाबादमधील शहरी भागासह ग्रामीण परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहत आहे. अनेक ठिकाणी बोअर वेलमधून पाण्याचे झरे फुटल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या भूजल पातळीतही 2 मीटरची वाढ झाली आहे, अशी माहिती भूजल सर्वेक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
यंदा ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान वातावरणात बदल होऊन सतत अतिवृष्टी झाली. यामुळे ग्रामीण भागात शेतीची मोठी हानी झाली आहे. मात्र यामुळे भूजल पातळी वाढण्यासदेखील मदत झाली. 7 ऑक्टोबरपर्यंत सरासरीच्या 167 टक्के पावसाची नोंद झाली आहे. नदी-नाल्याला पूर आले. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी पातळीतही मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. भूजल विभागाच्या वतीने दर चार महिन्यांत भूजल पातळीचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यात ही स्थिती दिसून येते.
जिल्ह्यातील 141 निरीक्षण विहिरींचे 1 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान सर्वेक्षणाची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. यात मागील पाच वर्षांतील पाणीपातळीची तुलनात्मक सरासरी काढण्यात आली आहे. त्यानुसार यंदा भूजल पातळी 2.06 मीटरने वाढल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील 9 पैकी पैठण तालुक्यात सर्वाधिक 4.5 मीटर वाढ झाली आहे. त्याखालोखाल वैजापूरमध्ये 3.1 मीटरने पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे यंदा भूजल पातळी वाढल्याने जिल्हा टँकरमुक्त होण्याचे संकेत दिसत आहेत.
औरंगाबाद- 1.9
फुलंब्री- 1.2
पैठण-4.5
गंगापूर-2.3
वैजापूर- 3.1
खुलताबाद- 0.65
सिल्लोड- 1.8
कन्नड- 2.2
सोयगाव- 0.9
एकूण- 2.06
इतर बातम्या-
Aurangabad: लसीकरण वाढवण्यासाठी मनपाकडे व्हॅक्सिनेटर्सचा तुटवडा, सध्याची केंद्रसंख्या अपुरी
आंध्रप्रदेशातून आलेला 39 किलो गांजा जप्त, तेलगू भाषिक आरोपींची चौकशी करताना औरंगाबाद पोलिसांची अडचण