औरंगाबाद: गुलाब चक्रिवादळामुळे मराठवाड्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. शेतकऱ्यांचं तर हाता-तोंडाशी आलेलं पिक डोळ्यादेखत वाहून गेलं. ग्रामीण भागातील अनेक शेतात गुडघाभर पाणी (Heavy Rainfall in Marathwada) साचलेलं असल्यानं एवढे खरीपाची संपूर्ण मेहनत आणि खर्च वाया गेल्याचे चित्र आहे. दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचेही तितकेच नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील एकूण क्षेत्रापैकी सुमारे 70 टक्के सोयाबीन (Sorabean crop) मातीमोल झाल्याची माहिती हाती येत आहे.
गेल्या दोन दिवसांतील अतिवृष्टीमुळे सोयाबीनला सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र यंदाच्या हंगामात सहा वेळेच सोयाबीनला फटका बसला आहे. तसेच खरीपातील इतर पिकांनाही मान्सूनचा चांगलाच तडाखा बसला आहे. काही पिके तर अगदी काढणीच्या अवस्थेत असताना मुसळधार पावसामुळे ती पाण्याखाली गेली.
सप्टेंबरच्या सुरुवातीला सात तारखेलाही अशीच अतिवृष्टी झाली होती. तेव्हा झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यातच आताची अतिवृष्टी झाली. त्यामुळे एकूण नुकसानीचा अंदाज बांधणे अवघड असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मागील दोन दिवसांत बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली, परभणी आदी जिल्ह्यात सर्वाधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्वांतील एकूण क्षेत्रफळात सर्वाधिक पिक सोयाबीनचे आहे. लातूर जिल्ह्यात 65 टक्के सोयाबीनचे पिक आहे. तर औरंगाबादमध्ये ६० टक्के भागात सोयाबीन घेतले जाते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 21 लाख 82 हजार 768 हेक्टरवर नुकसान झाले होते. त्यातील 20 टक्के पंचनामे अद्याप अपूर्ण आहेत. आता गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या माऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अगणित नुकसान झाले आहे.
औंरागाबदमधील शेतकऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात 28 हजार 422 हेक्टर सोयाबीनची लागवड झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून झालेल्या नुकसानीमुळे सोयाबीनची किंमत 9,500 रुपयांवरून घसरून 5,500 रुपये झाली होती. मात्र आता तर दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने उरले सुरले सोयाबीनचे पिकही पाण्याखाली गेले. त्यामुळे औरंगाबादमधीव जवळपास 20 हजारांपेक्षा जास्त शेतकरी संकटात आहेत.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी पूर्ण करणार आणि कधी शेतकऱ्यांना मदत मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील 21 लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यात पुन्हा नव्याने नुकसान झाले आहे, त्यामुळे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भऱपाई देण्याची मागणी जोर धरत आहे. औरंगाबाद विभागात 20 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यात सोयाबीन, कापूस, मका पेरणी जास्त झाल्याचे सहसंचालक दिनकर जाध यांनी सांगितले. तर लातूर विभागात 39 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली. यात 65 टक्के सोयाबीन त्यानंतर कापूस आणि इतर पिकांची पेरणी झाली, अशी माहिती सहसंचालक एस. के. केवेकर यांनी दिली.
इतर बातम्या-
पाऊस, वादळ वाऱ्याचा अंदाज शेतकऱ्यांना सांगणारं मेघदूत ॲप नेमकं काय?