औरंगाबाद: मराठवाड्यातील एकमेव प्राणीसंग्रहालय असलेल्या सिद्धार्थ उद्यानाचे (Siddharth garden and zoo, Aurangabad) ऐतिहासिक ठेवणीचे प्रवेशद्वार अखेर पाडण्यात आले आहे. उद्यानात प्रवेश देण्यासाठी आता नव्या झालेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील रस्ता वापरला जाईल. तसेच उद्यानाची प्रवेशद्वाराच्या उजवीकडे असलेली तिकिट खिडकीही हलवण्यात आली असून ती आता मागील बाजूस असेल.
औरंगाबाद महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी सिद्धार्थ उद्यानाची मुख्य रस्त्यालगतची जागा बीओटी प्रकल्पासाठी दिली होती. आता तेथे मोठे शॉपिंग कॉम्लेक्स उभारले जात आहे. त्यामुळे जुने प्रवेशद्वार या विकासकामात अडथळा ठरत होते. गुरुवारी सकाळी हे भव्य दगडी प्रवेशद्वार पाडण्यात आले. तसेच प्रवेशद्वाराच्या बाजूची तिकिट खिडकीची खोलीही पाडण्यात आली. उद्यावातील तिकिट खिडकीची खोली आता सध्याच्या जागेपासून दीडशे फूट आत बांधली गेली आहे.
औरंगाबाद हे देशपातळीवरील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने येथील सिद्धार्थ उद्यान पाहण्यासाठी देश व राज्यभरातून पर्यटक येत असतात. त्यातच येथील प्राणिसंग्रहालयातील वाघांनी विशेष ओळख मिळवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 26 वर्षात या प्राणीसंग्रहालयात तब्बल 35 वाघांचा जन्म झाला. 1995 मध्ये भुवनेश्वर येथील नंदनकानन प्राणिसंग्रहालयातून प्रमोद आणि भानुप्रिया या पांढऱ्या वाघाची जोडी सर्वप्रथम औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयात आणली होती. तर 2005 /e या वर्षी पंजाब येथील चतबीर झू मधून पिवळ्या रंगाच्या वाघाच्या दोन जोड्या आणल्या होत्या. गेल्या महिन्यातच पुण्यातील कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात येथील सात वर्षीय अर्जुन आणि पाच वर्षीय भक्ती या पिवळ्या वाघाच्या पिलांचे स्थलांतर करण्यात आले होते. उद्यानात पिवळ्या वाघांची संख्या मागील काही वर्षांपासून वाढत आहे. वाघांसाठीचे पोषक वातावरण येथे मिळत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
उद्यान बंद असल्याने कोट्यवधींचे नुकसान
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून सिद्धार्थ उद्यानासह प्राणिसंग्रहालयही सामान्य नागरिकांसाठी बंद आहे. उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी खूप खर्च करावा लागत आहे, मात्र त्यातून आर्थिक उत्पन्न शून्य असल्याने पालिकेवर अतिरिक्त बोजा पडत आहे. कोरोनाच्या पूर्वी उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्य़ा मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे पालिकेचे तत्कालीन आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी प्रवेश शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. वाढवलेल्या शुल्कातून उद्यानासह प्राणिसंग्रहालयाच्या देखभाल-दुरुस्तीची कामं करता येतील, अशी त्यांची भूमिका होती. त्यानुसार लहान मुलांसाठी दहा रुपये तर मोठ्यांसाठी वीस रुपये शुल्क आकारले जाऊ लागले. प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठीचे शुल्क पन्नास रुपये करण्यात आले. त्यापूर्वी उद्यानाचे शुल्क पाच आणि दहा रुपये तर प्राणिसंग्रहालयाचे शुल्क वीस रुपये होते. शुल्कवाढीमुळे पालिकेचे उत्पन्नही वाढले होते. उद्यान पाहण्यासाठी शनिवार-रविवारी सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त लोक तर इतर दिवशी अडीच-तीन हजार लोक येत असत. मात्र मार्च 2020 पासून हे उद्यान सामान्यांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
इतर बातम्या:
अखेर ‘त्या’ रिक्षाचालकाच्या मुसक्य़ा आवळल्या, चालत्या रिक्षात तरुणीला छेडणं महागात