गडचिरोली: माझ्या राजकीय जीवनात अनेक धमक्या आल्या, पण त्यांना मी कधीही जुमानलं नाही. माझ्या कामावर त्याचा परिणाम झाला नाही आणि आताही होणार नाही, असं वक्तव्य गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. तसेच गडचिरोलीच्या (Gadchiroli District) विकासाला नेहमीच प्राधान्यक्रम देईन, असं आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिलं. रविवारी गडचिरोलीतील पोलीस आणि नक्षलवाद्यांची मोठी चकमक उडाली. यात 26 नक्षलवादी मारले गेले. या पार्श्वभूमीवर एकूणच नक्षलवादाची समस्या आणि गडचिरोलीतील तरुणांच्या प्रश्नांबाबत त्यांनी वक्तव्ये केली.
हाताला काम नसलेली तरुण मुले नक्षलवादासारख्या प्रवाहाशी जोडले जातात, हे वास्तव असून येथील तरुणांच्या हाताला योग्य काम मिळायला हवं. त्यामुळेच हे तरुण वाईट मार्गाला जाणार नाहीत, यासाठी गडचिरोलीतील विकासाची कामं प्राधान्यक्रमाने केली जातील, असं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.
नक्षलवादी चळवळीतील अनेक नक्षलवादी आत्मसमर्पण करतात. अशा नक्षल्यांसाठी सरकारतर्फे नवी योजना आणणार असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं. तसेच गडचिरोलीत नेहमीच पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडत असते. असा वेळी जखमी जवानांवर उपचार करण्यासाठी शहरातच मेडिकल कॉलेज सुरु करण्याचा विचार आहे, असं वक्तव्यही एकनाथ शिंदे यांनी केलं. तसेच अनेक वर्षांपासून नक्षलींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आता मात्र त्यावर अग्रक्रमाने विचार करणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लॉयड मेटल्सच्या लोह खनिज प्रक्रिया प्रकल्पातून अनेकांना नोकऱ्या मिळणार आहे. येथील तरुणांसाठी हा प्रकल्प आशादायी ठरेल. तसेच केवळ महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिनही राज्यांत मिळून हे काम केलं जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
इतर बातम्या-