महेंद्र कुमार मुधोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड | 29 सप्टेंबर 2023 : मुलुंडमध्ये एका मुलीला केवळ ती मराठी आहे म्हणून घर नाकारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सर्व सामान्य जनतेमधून या प्रकारावर चीड व्यक्त केली जात आहे. तर या प्रकारामुळे राजकीय वर्तुळही ढवळून निघालं आहे. मनसे आणि ठाकरे गटासह सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी तर त्यांनाही हा अनुभव आल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार आपल्याबाबतीत कधी घडला याची माहितीही पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. आज एका मराठी मुलीची मी व्यथा पाहिली. खरंतर भाषा आणि प्रांतवादात मला पडायला आवडत नाही. माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात मी जातीयवाद, भाषावाद आणि प्रांतवादावर टिप्पणी केली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावं, कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घरांची, दुकानांची नावे ठेवावी यात मी फार उडी घेत नाही. परंतु, एक मुलगी जेव्हा रडून सांगत होती, इथे मराठी माणसाला घर देत नाही, किंवा मराठी माणसाला सोसायटीत राहण्याची परवानगी नाही. हे धक्कादायक आहे. या मुलीसोबत जो प्रकार झाला. तो प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
जेव्हा मला सरकारी घर सोडून नवं घर घ्यायचं होतं, तेव्हा मलाही हाच अनुभव बऱ्याच ठिकाणी आला. मराठी लोकांना आम्ही घर देत नाही, असं सांगितलं गेलं, असा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांनी केला आहे. मी कोणत्याही एका भाषेची किंवा एका गोष्टीची बाजू घेत नाही. कारण मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषेने, जातीने आणि धर्माने नटलेलं आहे. मुंबई ही राजकीय नसून आर्थिक राजधानी आहे.
त्यामुळे या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे. पण जर कोणी मराठी म्हणून घर देत नसेल, बिल्डिंगमध्ये प्रवेश नाकारत असेल तर ते दुर्देवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीलाही असा अनुभव आला हे फार दुर्देवी आहे. या देशातील प्रत्येक राज्यात प्रत्येक भाषेच्या प्रत्येक राज्याच्या लोकांना घर देण्यासाठी परवानगीची गरज काय हा माझा प्रश्न आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
आज गणेश विसर्जनाचं आहे. त्यामुळे गणेशाचं विसर्जन नाही, तर सर्व वाद, आतंक, जाती, धर्म आणि प्रांतवादाचं विसर्जन आपण नाही का करू शकत? बघा कसं वाटतं? माझी भूमिका कुणासाठी नाही. ही भूमिका सर्वांनी एक व्हावे यासाठी आहे, असंही पंकजा यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांची तब्येत ठिक नाही. याची माहितीही त्यांनी दिली. थोडी प्रकृती खराब आहे. बोलायला त्रास होतो. थोडी मनस्थितीही खराब आहे, असं त्यांनी सांगितलं.
आताच्या राजकारणातलं वातावरण, ओव्हरऑल समाजातील वातावरण, इतकं सगळं असताना, इतकी समृद्धी असताना समाजात अस्वस्थता आहे. रस्ते आहेत. हायवे आहेत. लोकांना सर्व सुविधा आहेत. प्रत्येकाकडे गाड्या आहेत. साधनं आहेत. हे सर्व असताना समाजामध्ये कुठे तरी अस्वस्थता वाटते, असंही त्या म्हणाल्या.
आरक्षणाची भांडणं सुरू आहेत. वेगवेगळ्या समाजातील लोकं, कोणी मुंडन करतोय, कोणी आंदोलन करतोय, कोणी काय करतोय हे बघून हृदयाला पिळ पडतोय, त्याच बरोबर प्रत्येक रंगात माणूस वाटला गेलाय. हिरवा आहे, भगवा आहे, पिवळा आहे, निळा आहे हे सर्व बघून हे सर्व रंग जोरजोरात फिरवले ना त्यातून पांढरा रंग येतो. तो शांततेचा रंग आहे. हा रंग कधी आपल्या देशाला व्याप्त करेल याची मी प्रतिक्षा करतेय, असंही त्यांनी म्हटलंय.