छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) आज संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) पहिली मोठी जाहीर सभा पार पडली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या सभेला शहरातील नागरिकांनी फार चांगला प्रतिसाद दिला नाही. सभेसाठी बाहेरची माणसंच जास्त आलेली होती, असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला. याशिवाय इतकी वर्ष शिवसेनेची शहराच्या महापालिकेत सत्ता होती. पण लोकांना अद्याप पाणी पुरवता आलं नाही, अशा शब्दांत जलील यांनी कानउघाडणी केली.
“जेव्हा मी माझ्या बाबतीत बोललो होतो तेव्हा मला वाटत होतं की ते विकासाच्या बाबतीत काही बोलणार आहेत. शहराच्या महापालिकेत आपली इतकी वर्ष सत्ता होती आणि आपण लोकांना पाणी देऊ शकला नाहीत. जाता-जाता शहराला नवीन नाव देऊन गेला आहात. आपला अजेंडा काय आहे? लोकं खूप त्रस्त झाले आहेत”, असं इम्तियाज जलील म्हणाले.
“तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा वारंवार काढत आहात. लोकांना काय पाहिजे? तर रोजगार पाहिजे. लोकांना पाणी, चांगले रस्ते पाहिजे, या सर्वसामान्य गोष्टी लोकांना पाहिजे आहेत. लोकांच्या या अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय सामान्य असलेल्या गरजांवर तुम्ही बोलायला तयार नाहीत. फक्त एकमेकांवर चिखल फेकण्यासाठी तुम्ही मोठी सभा घेत असाल तर एकवेळ अशी येईल फक्त मंचावर जास्त लोकं दिसतील, समोर कुणी बसलेलं दिसणार नाही. कारण लोकं खूप हैराण झाली आहेत”, असं जलील म्हणाले.
“महाविकास आघाडीच्या आजच्या सभेला शहराकडून खूप जास्त प्रतिसाद मिळालेला बघायला मिळाला नाही. बाहेर गावातून जास्त गाड्या आलेल्या होत्या. या सभेला बाहेरचे लोकं खूप आणले गेले होते”, असा टोला त्यांनी लगावला.
“भाजप आणि शिवसेनेचे नेते गँग सारखी वागू लागलेली आहे. आज सावकरांची पुण्यतिथी होती की जयंती होती का? फक्त पोलिसांवर दबाव निर्माण करायचं होतं का? पोलिसांवरचा ताण वाढवायचा. अरे तुम्ही तर सत्तेमध्ये बसला आहात. सरकार तुमचं होतं ना? मग ही जबाबदारी तुमची आहे. तुम्हीच असं वागणार असाल तर काय होणार?”, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.